मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस असून त्यांना भेटण्यासाठी लवकर जायचे आहे, त्यामुळे कामकाज ६ वाजेपर्यंत संपवा अशी विनंती ठाकरे गटाच्या आमदारांकडून करण्यात आली. मात्र त्यांना जायचे तर जाऊ द्या कामकाज पूर्ण होईपर्यंत चालवा, असा आग्रह भाजप सदस्य प्रवीण दरेकर यांनी धरल्याने सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात विधान परिषदेत जोरदार खडाजंगी झाली.
गुरुवारी उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस असल्याने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसेनेच्या सदस्यांना लवकर जायचे होते. त्यामुळे ठाकरे गटाकडून उपसभापतींना विनंती करण्यात आली. मात्र दरेकर यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे ठाकरे गटाचे अनिल परब, सचिन अहिर व इतर सदस्य चांगलेच भडकले.
...तर सहकार्याची अपेक्षा सोडा
यावेळी परब म्हणाले, उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस पावसाळी अधिवेशनादरम्यान येतो. त्यामुळे दरवर्षी आमचे सर्व आमदार त्यांना शुभेच्छा देण्यासाठी न चुकता जात असतात. त्यामुळे सभागृहाचे कामकाज ६ वाजेपर्यंत चालवावे अशी आमची विनंती आहे. आम्ही सभागृह चालावे म्हणून सहकार्याची भूमिका घेतो. मग तुम्ही एक दिवस आम्हाला सहकार्य करणार नसाल तर अधिवेशनात आमच्याकडून सहकार्याची अपेक्षा सोडा.
प्रश्नांचा भडीमार
मंत्री अतुल सावे हे गृहनिर्माण विभागासंबधीचे विधेयक मांडत असताना ठाकरे गटाच्या सदस्यांनी त्यांच्यावर प्रश्नाचा भडीमार केला. त्यावर मंत्री सावे यांना फारसे काही सांगता आले नाही. शेवटी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी हस्तक्षेप करत उपमुख्यमंत्री या संदर्भात सविस्तर निवेदन करतील असे सांगितले. त्यानंतर सभागृह दहा मिनिटे तहकूब करीत ठाकरे गटाच्या सदस्यांना दालनात बोलावून उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला जाता यावे याकरिता तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर सभागृह पूर्ववत चालू झाले.