Join us

जागेवर जाऊन पाहा, नालेसफाई नीट होतेय का?; मुंबईची तुंबई रोखण्यासाठी आयुक्तांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2023 11:29 AM

यंदाच्या पावसाळ्यात मुंबईची तुंबई होणार नाही असेच सध्यातरी दिसत आहे. 

मुंबई : सुशोभीकरण प्रकल्पातील ५० टक्के कामे नियोजित वेळापत्रकाप्रमाणे पूर्ण झाली असून उर्वरित कामे ठरलेल्या वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत. पावसाळापूर्व कामांचादेखील आपआपल्या पातळीवर आढावा घेऊन या कामांना गती द्यावी. नाले सफाईच्या कामांना उपआयुक्त आणि सहायक आयुक्तांनी भेटी द्याव्यात, असे निर्देश आयुक्तांनी दिले. लवकरच त्यासंदर्भात वरिष्ठ स्तरावर बैठक घेण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात मुंबईची तुंबई होणार नाही असेच सध्यातरी दिसत आहे. 

जी-२० परिषदेच्या सुशोभीकरण कामांमध्ये पुनर्वापरात येऊ शकणारे साहित्य योग्यरीत्या जपून ठेवावे,  जेणेकरून खर्चाची पुनरावृत्ती टळेल, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. मे मध्ये जी-२० परिषदेच्या पुढील बैठका होणार आहेत. त्याविषयीच्या नियोजनाला प्रारंभ करावा, म्हणजे पावसाळापूर्व कामे व इतर दैनंदिन कामकाजावेळी धावपळ होणार नाही, असे निर्देशही त्यांनी दिले.

मुंबई सुशोभीकरण प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात ५००, तर दुसऱ्या टप्प्यात ३२० व इतरही अतिरिक्त अशी एकूण १ हजार ०७७ कामे हाती घेतली आहेत. पैकी ६१३ कामे पूर्ण झाली आहेत म्हणजे ५० टक्के कामे ठरल्याप्रमाणे मार्चअखेर पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामे प्रगतिपथावर असून ती देखील नियोजित वेळापत्रकाप्रमाणे विशेषतः पावसाळा सुरु होण्याआधी पूर्ण करावीत, विद्युत रोषणाईसंबंधी कामे येत्या महिन्यात पूर्ण करावीत, अशी सूचना आयुक्तांनी केली.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकापाऊसपाणी