मुंबई-
देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीसाठीचा कार्यक्रम आज केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर केला. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोव्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. यात गोवा आणि उत्तर प्रदेशात काही जागांवर शिवसेना देखील लढणार असल्याची माहिती शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. यात गोव्यात अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत चर्चा सुरू असून महाविकास आघाडीच्या नेतृत्त्वात गोव्यात निवडणूक लढवली जावी अशी आमची इच्छा आहे. पण काँग्रेसनं तयारी दाखवायला हवी, असं संजय राऊत यावेळी म्हणाले. तसंच सत्ताधारी भाजपानं काही विरोधकांना हाताशी धरलंय का अशी शंका येऊ लागलीय, असंही राऊत यावेळी म्हणाले.
गोव्यात यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेसह आप आणि तृणमूल काँग्रेस देखील निवडणुकीच्या रिंगणात आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात विरोधक गोव्यात निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचा सत्ताधारी भाजपाला मतविभाजणीच्या मुद्द्यावरुन फायदा होईल असं वाटतं का? असा प्रश्न राऊत यांना विचारण्यात आला असता त्यांनी एक वेगळीच शंका उपस्थित केली.
मला फक्त एका गोष्टीची भीती..."गोव्यात मतांची विभागणी व्हावी यासाठी भारतीय जनता पक्षानं काही विरोधी पक्षांना हाताशी धरलंय का? अशी शंका निर्माण होऊ लागली आहे. विरोधी पक्षांना खूप जाणीवपूर्वक काम करणं गरजेचं आहे. त्यांनी एकत्रपणे निवडणूक लढायला हवी. गोव्यातल्या जनतेला भाजपाला झिडकारायचं आहे. लोकांच्या मनात भाजपाबाबत संताप आहे. पण विरोधी पक्षामध्ये एक्य नसल्यामुळे भाजपाला फायदा होईल याची भीती मला वाटतेय", असं संजय राऊत म्हणाले.
राहुल गांधींची आघाडीची इच्छा पण...गोव्यात महाविकास आघाडी व्हावी अशी राहुल गांधींचीही पण इच्छा आहे. पण काँग्रेसचे स्थानिक नेत्यांना अजूनही बहुमताचं सरकार येईल असा विश्वास आहे. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. आमचं अजूनही गोव्यातील आघाडीबाबत बोलणं सुरू आहे, असं संजय राऊत म्हणाले.
गोवा, उत्तर प्रदेशात शिवसेना लढणार"आमची गोव्यात आणि उत्तर प्रदेशात लढण्याची तयारी सुरु आहे. गोवा, उत्तर प्रदेश पंजाबमध्ये इतर मोठे पक्ष आहेत. ते नक्कीच चांगली तयारी करत आहेत. त्यांचा प्रचार, बॅनर, होर्डिंग दिसत असतील. तसं काही शिवसेनेचं दिसत नसेल पण शिवसेनेचा विचार आणि भूमिका लोकांपर्यंत जात असते. आमचे कार्यकर्ते निवडणुका लढवत असतात आणि त्यांच्या पाठीशी उभं राहणं आमचं कर्तव्य आहे', असं संजय राऊत यांनी म्हटलं.