मुंबई - महाराष्ट्रातील शिवसेना नेते केवळ निवडणुकीच्या वेळी गोव्यात येऊन बेटकुळ्या फुगवून दाखवतात. पण गोव्यातील राजकारणात शिवसेनेला काहीही महत्त्व नाही हे पुन्हा गुरुवारी लागलेल्या निकालाने दाखवून दिले आहे. आम आदमी पार्टी व रिवोल्यूशनरी गोवन्सने विधानसभेत खाते खोलले. मात्र, शिवसेना उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. विशेष म्हणजे भाजपच्या प्रमोद सावंत यांच्याविरोधात उभारलेल्या शिवसेना नेत्याला केवळ दोन अंकी मतं मिळाली आहेत.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी वारंवार गोव्याला भेटी दिल्या. त्यांनी उत्पल पर्रीकर विरुद्ध भाजप मुद्दा बनविण्याचाही प्रयत्न केला. शेवटच्या टप्प्यात शिवसेनेचे स्टार प्रचारक म्हणून महाराष्ट्राचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्या म्हापसा, डिचोली, वास्को, साखळी येथे सभाही झाल्या. या चारही ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी झाले. शिवसेनेच्या उमेदवारांचे डिपॉझिटही ते वाचवू शकले नाहीत. तर, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याविरोधात उभारलेल्या शिवसेना उमेदवाराला केवळ 97 मतं मिळाली आहेत.
गोव्यातील संक्क्वेलिम मतदारसंघातून भाजपचे प्रमोद सावंत विजयी झाले आहेत. याच मतदारसंघात शिवसेनेनंही आपला उमेदवार उभा केला होता. त्यासाठी, शिवसेना नेतेही प्रचाराला आले होते. मात्र, शिवसेनेचे सागर धरगालकर यांना केवळ 97 मतं मिळाली आहेत. या मतदारसंघात भाजप उमेदवार आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे विजय झाले. सावंत यांना 11795 मतं मिळाली असून काँग्रेस उमेदवार धर्मेश सगलानी यांचा त्यांनी पराभव केला, त्यांना 11414 मतं मिळाली आहेत. या मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकावर संजय गौस हे असून ते रिव्हॉल्यूशनरी गौंस पक्षाचे उमेदवार आहेत. त्यांनी या मतदारसंघातून 740 मतं घेत तिसरे स्थान पटकावले आहे. विशेष म्हणजे येथे नोटाला 284 मतं मिळाल्याने शिवसेना उमेदवाराला नोटापेक्षाही कमी मतदान झाल्याचं स्पष्ट होत आहे.
देवेंद्र फडणवीस यांनीही केली टीकाप्रमोद सावंत यांच्याविरोधात उभा राहिलेल्या शिवसेना उमेदवाराला केवळ 97 मतं मिळाली आहेत. गोव्यात महाराष्ट्रातील भाजपच्या सेनेनं मोठं काम केलं. या विजयात सेनेचं मोठं योगदान आहे. दुसऱ्या सेनेचं गोव्यात काय झालं हे आपण पाहिलं. विशेष म्हणजे राष्ट्रवादी आणि शिवसेनेची मतं एकत्र केली, तरी नोटापेक्षा ही मतं कमी आहेत, असे सांगत दोन्ही पक्षाला फडणवीसांनी टोला लगावला.