Join us

Goa Assembly Result: फडणवीसांनी गोव्यातील विजयाचं श्रेय दोघांनाच दिलं, स्वत:चं नाव नाही घेतलं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 4:22 PM

युपीसह गोव्यातील विजयानंतर देशभरातून भाजपचं अभिनंदन करण्यात येत आहे

मुंबई - देशातील ५ राज्यांच्या निवडणूक निकालाचं चित्र आता हळूहळू स्पष्ट होत आहे. गोवा विधानसभा निवडणुकीत सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपा-काँग्रेस यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळत होती. त्यानंतर आता भाजपाने बढत घेतली असून गोव्यात भाजपानं बहुमताचा आकडा गाठला आहे. भाजपाला २१ जागा, काँग्रेस १२ जागांवर आघाडीवर आहे. टीएमसीही ५ जागांवर आघाडीवर आहे. या विजयानंतर गोव्याचे प्रभारी आणि महाराष्ट्राचे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

युपीसह गोव्यातील विजयानंतर देशभरातून भाजपचं अभिनंदन करण्यात येत आहे. तर, भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळत आहे. गोव्याचे प्रभारी असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यातील विजयाचे श्रेय दोघांना दिले आहे. ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना. गोव्यात एन्टीइंन्कबन्सीचा परिणाम होईल, भाजपची पिछेहट होईल, असे अनेकांना वाटत होते. मात्र, गोव्यात भाजपने मोठं यश मिळवलं. नरेंद्र मोदींनी देशात जो विश्वास तयार केलाय, त्याचा हा परिणाम आहे. त्यासोबतच, प्रमोद सावंत यांनी गोव्यात डबल इंजिनने ज्या पद्धतीने सरकार चालवले, त्यामुळे जनतेचा विश्वास संपादन केला. त्यामुळे, या विजयाचे श्रेय नरेंद्र मोदी आणि प्रमोद सावंत यांचेच असल्याचे फडणवीस यांनी म्हटले.   

फडणवीसांनी आखली होती रणनिती

गोव्यात भाजपाने देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांना निवडणूक प्रभारी केले होते. देवेंद्र फडणवीसांनी गोव्यात भाजपाला बहुमत मिळवण्यासाठी रणनीती आखली. तीच भाजपाच्या यशातून दिसून येत असल्याचं निकालातून दिसत आहे. गोव्यात मागील वेळी बहुमतापासून दूर राहिलेली भाजपानं यंदा बहुमत गाठल्याचं दिसून येत आहे. तर या निवडणुकीच्या निकालावर(Goa Election Result 2022) भाष्य करताना गिरीश महाजन म्हणाले की, गोव्यात भाजपाचं सरकार येणार आहे. त्यात कुठलंही दुमत नाही. संख्या कमी-अधिक होईल. पण गोव्यात भाजपाचं सरकार होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

आजच राज्यपालांची भेट घेणार

गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपाकडे १९ जागांवर आघाडी आहे. तर काँग्रेसला १२ जागांवर यश प्राप्त झालं आहे. टीएमसी आणि मित्र पक्षांकडे तीन जागा आहेत. तर आम आदमी पक्षालाही दोन जागांवर यश मिळालं आहे. अशावेळी गोव्यात सत्तास्थापनेसाठी आघाडीचं आणि आमदारांच्या पळवापळवीचं राजकारण सुरू होऊ नये याची पुर्णपणे काळजी भाजपाकडून घेतली जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपाचे सध्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत थोड्याच वेळात राज्यपालांची भेट घेणार असून सत्तास्थापनेचा दावा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर आजच संध्याकाळी भाजपा सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे.  

टॅग्स :देवेंद्र फडणवीसगोवानिवडणूकप्रमोद सावंतनरेंद्र मोदी