गोवा खड्डेमुक्त, मग मुंबई का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 06:33 AM2019-07-11T06:33:56+5:302019-07-11T06:34:30+5:30

नगरसेवकांचा पालिका प्रशासनाला सवाल

Goa is free from pathholes, then why not Mumbai? | गोवा खड्डेमुक्त, मग मुंबई का नाही?

गोवा खड्डेमुक्त, मग मुंबई का नाही?

Next

मुंबई : मुसळधार पावसामुळे यंदाही मुंबईचे रस्ते खड्ड्यात गेले आहेत. मात्र, मुसळधार पावसानंतरही गोवा खड्डेमुक्त आहे. मग श्रीमंत मुंबई महापालिकेचे रस्ते खड्ड्यात का? असा सवाल सर्वपक्षीय नगरसेवकांनी स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी केला. या प्रकरणी सदस्यांनी प्रशासनाला चांगलेच फैलावर घेतले.


मुंबई खड्डेमुक्त करा, नंतरच नवीन रस्त्यांचे प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी आणा, असा टोला विरोधी पक्षनेते रविराजा यांनी लगावला. तर, गोव्याचा अर्थसंकल्प मुंबई पालिका अर्थसंकल्पाच्या तुलनेत केवळ २० टक्केच आहे, तरीही तेथील रस्ते खड्डेमुक्त होऊ शकतात, परंतु श्रीमंत पालिका क्षेत्रात हे शक्य नाही? रस्ते विभागातील अभियंता, अधिकाऱ्यांना गोव्यातील रस्त्यांच्या अभ्यासासाठी पाठवा, अशी सूचना भाजपचे अभिजीत सामंत यांनी केली.


येथे करा तक्रार...
नागरिकांना तक्रारी करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप, संकेतस्थळ, दूरध्वनी यासारखे पर्याय उपलब्ध असून, पालिकेच्या अ‍ॅन्ड्रॉइड अ‍ॅपमध्ये रस्तेविषयक तक्रारींसाठी स्वतंत्र मोड्युल कार्यरत आहे. यामध्ये १० जून ते ९ जुलै, २०१९ या एका महिन्याच्या कालावधीत १,०७० तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

धोकादायक खड्डे जाहीर करा
धोकादायक इमारती, झाडे याप्रमाणे आता खड्डाही धोकादायक जाहीर करा, म्हणजे मुंबईकर जिवाची काळजी घेत खड्ड्याजवळून जाणे टाळेल, असा टोला सदस्यांनी लगावला.
कोल्डमिक्स-हॉटमिक्स वाद
दोन वर्षांपूर्वी कोल्डमिक्स प्लांटची पाहणी केली असता, ते बंद असल्याचे आढळून आले होते. २७ रुपयांचे कोल्डमिक्स वापरून मुंबईकरांच्या जिवाशी खेळ खेळला जातो. त्यामुळे कोल्डमिक्सऐवजी हॉटमिक्सचा वापर करा, अशी मागणी सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी केली. मात्र, कोल्डमिक्सचा वापर पावसात होतो, तर हॉटमिक्सचा वापर कधीही केला जाऊ शकतो, असे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांनी स्पष्ट केले.
८० ते ९० टक्के खड्डे बुजविल्याचा दावा
च्८० ते ९० टक्के खड्डे बुजविले असून, फक्त २०% खड्डे बुजविणे बाकी असल्याचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांनी स्थायी समितीसमोर स्पष्ट केले.

Web Title: Goa is free from pathholes, then why not Mumbai?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.