अबू आझमींच्या पुतण्याची गोवा एनसीबीकडून चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:06 AM2021-07-11T04:06:20+5:302021-07-11T04:06:20+5:30
ड्रग्ज तस्करी प्रकरण लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांचा पुतण्या अस्लम आझमी पुन्हा ...
ड्रग्ज तस्करी प्रकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांचा पुतण्या अस्लम आझमी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ड्रग्ज तस्करीप्रकरणी अमली पदार्थ नियंत्रण कक्षच्या (एनसीबी) गोव्याच्या पथकाने शनिवारी त्याच्याकडे कसून चौकशी केली. बॉलिवूडमधील लोकांना तो मादक द्रव्याची तस्करी करीत असल्याचा अधिकाऱ्यांना संशय आहे.
दोन दिवसांपूर्वी मीरा रोड येथून अटक केलेल्या सुफरान लकडावाला याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार त्याच्याकडे विचारणा करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
गोव्याच्या एनसीबी पथकाने ८ जुलैला मीरा रोड येथे छापा टाकून लकडावालाला अटक केली होती. त्याच्याकडील चौकशीमध्ये त्याने बॉलिवूडमधील काही मंडळींना ड्रग्ज पुरवित असल्याचे समोर आले. अस्लम आझमीच्या मध्यस्थीतून त्याने हा पुरवठा केल्याची कबुली दिल्याने एनसीबीने अस्लम आझमीला चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजाविले होते. अस्लमला २०१७ मध्ये ड्रग्ज तस्करीमध्ये अटक करण्यात आली होती.