गो एअर व इंडिगोच्या विमानांची दर आठवड्याला सुरक्षा तपासणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 02:21 AM2019-02-12T02:21:00+5:302019-02-12T02:21:16+5:30
प्रॅट अॅन्ड व्हिटनी प्रकाराचे इंजिन असलेल्या ए ३२० निओ प्रकाराच्या ११०० सीरिजच्या विमानांमध्ये सतत उद्भवणाऱ्या तांत्रिक बिघाडाची गंभीर दखल नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए)ने घेतली आहे.
मुंबई : प्रॅट अॅन्ड व्हिटनी प्रकाराचे इंजिन असलेल्या ए ३२० निओ प्रकाराच्या ११०० सीरिजच्या विमानांमध्ये सतत उद्भवणाऱ्या तांत्रिक बिघाडाची गंभीर दखल नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए)ने घेतली आहे. ही विमाने वापरणाºया गो एअर व इंडिगोच्या विमानांची दर आठवड्याला बारकाईने सुरक्षा तपासणी करण्याचे निर्देश डीजीसीएने दिले आहेत.
या प्रकाराचे इंजिन असलेल्या विमानाच्या उड्डाणामध्ये विमान हवेत असताना इंजिनामध्ये बिघाड, ते बंद होणे अशा तक्रारी सतत येतात. त्यामुळे अनेकदा विमानाला इर्मजन्सी लँडिंग करावे लागले आहे. एक्स्टेंडेड डायव्हर्जन टाईम आॅपरेशन (ईडीटीओ)द्वारे या विमानांना एका तासात जवळच्या विमानतळावर परतता येईल अशा मार्गावर उड्डाण करण्याची परवानगी दिली आहे. केबिन क्रूना याबाबत प्रशिक्षण देऊन आगीचा दुर्गंध आल्यास लक्ष ठेवण्याची शिफारस केली आहे.
दरम्यान, इंडिगो व जेटच्या ताफ्यात एअर बस ३२० निओ व बोर्इंग ७३७ मॅक्स यांचा समावेश करण्यास अडथळे येत आहेत. जेटला याबाबत डीजीसीएने परवानगी नाकारली. या विमानांची कार्यक्षमता, सुरक्षा याबाबत धोका पत्करण्यास डीजीसीएने नकार दिला.
याचसंदर्भात इंडिगोच्या वतीने करण्यात आलेली मागणीही डीजीसीएने यापूर्वीच फेटाळली होती. जेट, इंडिगोला घालण्यात आलेले हे निर्बंध डीजीसीएकडून सुरक्षेच्या दृष्टीने घातले गेले आहेत. मात्र याचा फटका कंपनीच्या व्यवसायावर होत असल्याचा दावा या कंपनींकडून करण्यात येत आहे.