'बकरा' नव्हे, बकरी सापडली अन् रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी सुरू केली गटारीची तयारी!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2018 04:32 PM2018-08-02T16:32:38+5:302018-08-02T18:24:30+5:30
श्रावण महिन्यापूर्वी येणाऱ्या अमावस्येला गटारी साजरी करण्याची परंपरा आहे. गटारीसाठी खवय्ये विविध मांसाहाराचा ताव मारण्याचा बेत आखतात. याच धर्तीवर मध्य रेल्वेने विनातिकीट बकरी 2 हजार पाचशे रुपयांमध्ये विकत घेत गटारीची जोरदार तयारी केली आहे.
मुंबई : श्रावण महिन्यापूर्वी येणाऱ्या अमावस्येला गटारी साजरी करण्याची परंपरा आहे. गटारीसाठी खवय्ये विविध मांसाहाराचा ताव मारण्याचा बेत आखतात. याच धर्तीवर मध्य रेल्वेने विनातिकीट बकरी 2 हजार पाचशे रुपयांमध्ये विकत घेत गटारीची जोरदार तयारी केली आहे. विशेष म्हणजे लिलाव प्रक्रियेत बकरी खरेदी करणारा अब्दुल रेहमान हा पार्सल विभागातील कर्मचारी असल्याची माहिती समोर येत आहे.
मध्य रेल्वेवर मंगळवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास एक प्रवासी बकरीसोबत मशीद स्थानकात प्रवेश करताच तिकीट तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्याने संबंधिताकडे तिकिटांची मागणी केली. प्रवाशाने त्याचे तिकीट दिले. मात्र, बकरीचे तिकीट नसल्यामुळे तपासणी अधिकाऱ्यांच्या हाती बकरी सोपवून प्रवाशाने धूम ठोकल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. रेल्वे नियमानुसार गुरुवारी या बकरीची लिलाव प्रक्रिया ठरवण्यात आली. त्यानुसार, अब्दुल रहेमान नावाच्या व्यक्तीने ही बकरी 2 हजार पाचशे रुपयांमध्ये विकत घेतली. विशेष म्हणजे अब्दुल रेहमान हा मध्य रेल्वेच्या पार्सल विभागात कार्यरत आहे. दरम्यान, याबाबत मध्य रेल्वेशी संपर्क साधला असता बकरीचा 2 हजार 500 रुपयांमध्ये लिलाव झाला असून अन्य तपशील देण्यास रेल्वे विभागाकडून नकार देण्यात आला आहे.
रेल्वे नियमानुसार...
रेल्वे प्रवासात पाळीव प्राण्यांची ने-आण करण्यासाठी विशिष्ट नियम आहेत. लांब पल्ल्यांच्या प्रवासात श्वानांसाठी स्वतंत्र व्यवस्था असते. पण लोकल मार्गावर पाळीव प्राणी नेण्यास बंदी आहे. मात्र, प्रवाशाने बकरी अधिकाऱ्यांच्या हाती सोपवल्यामुळे अधिकाऱ्याने बकरी सीएसएमटी येथील पार्सल विभागाकडे सोपवली होती.