देव माणसांत दिसला; कुठे रक्त तर कुठे अन्नदान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2020 02:06 PM2020-04-19T14:06:38+5:302020-04-19T14:08:22+5:30
मुंबईकरांनी घडविले सामर्थ्यासह संयमाचे दर्शन
मुंबई : कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच चालला आहे; आणि सुरक्षेच्या कारणात्सव लॉक डाऊनाचा कालावधीदेखील वाढविण्यात आला आहे. मात्र आता या लॉकडाऊनच्या कालावधीत हातावर पोट असलेल्यांचे, मजुरांचे, कामगारांचे, गरिबांचे, बेघरांचे अतोनात हाल होऊ लागले आहेत. पोटाची भुक भागविण्यासाठी त्यांना पायपीट करावी लागत आहे. रेशनच्या दुकानाबाहेर रांगा लावाव्या लागत आहेत. एवढे करूनही पोटाची खळगी भरेल की नाही याची शाश्वती नाही. परिणामी अशा गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठी माणसामाणसांतला ‘देव’ जागा झाला आहे. आणि माणूसकीच्या नात्याने प्रत्येक जण प्रत्येकाला अन्न, धान्य अशा स्वरुपात मदत करत असून, रुग्णालयात रक्ताचा पुरवठा कमी पडू नये म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजनही केले जात आहे. एकंदर कोरोनाला हरविताना मुंबईकरांनी पुन्हा एकदा आपल्या सामर्थ्याचे, सयंमाचे दर्शन घडविले असून, दिवसागणिक मदतीचा ओघ वाढत असल्याचे चित्र आहे.
ग्लोबल शिपर्स कम्युनिटी या एनजीओद्वारे मुंबईसह राज्यभरात अन्नदानाचे काम हाती घेण्यात आले आहे. ही कम्युनिटी एक वर्ल्ड इकॉनॉमी फोरम आहे. त्यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. मुंबईत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाचे नेतृत्व सलोनी भल्ला करत आहेत. यासाठी ८ लोकांची टीम काम करत आहेत. या उपक्रमांतर्गत लोकांना एका किटचे वितरण करण्यात येत आहे. या किटमध्ये दोन सनिटायर्जस बॉटल, तीन मास्क , डाळ, तांदूळसारख्या अन्नधान्याच्या समावेश आहे. ग्लोबल शिपर्स कम्युनिटी या एनजीओच्या प्रकल्प समन्वयक सलोनी भल्ला यांनी याबाबत सांगितले की, दक्षिण मुंबईसह ठाणे, पनवेल आणि रायगड येथील झोपड्यांमध्ये, कॅम्पमध्ये २६ हजार जेवणाचे गरम पॅकेट देण्यात आले. धारावी, पनवेल आणि रायगड येथे ३८ हजार ५०० जेवणाचे वाटप करण्यात आले. मुंबई आणि नवी मुंबई येथील सरकारी रुग्णालयात ४ हजार ७०० मास्क देण्यात आले. तर ३०० सॅनिटायझर्सचे वाटप करण्यात आले. मुंबई महापालिका आणि पनवेल महापालिका यांची याकरिता मदत झाली, अशी माहितीही सलोनी यांनी दिली.
अॅम्पेल मिशनचे संस्थापक डॉ. अनिल काशी मुरार्रकायांनी सांगितले की, केवळ कोरोना नाही तर आम्ही नेहमी लोकांना मदत करतो. मालाड मालवणी, वरळी नाका, गोवा राज्यातील पणजी शहरात यावेळी मदत केली आहे. कोरोनाच्या काळात म्हणजे लॉकडाऊनच्या काळात लोकांना, गरिबांना बाहेर निघता येत नाहीत. त्यामुळे मालाड, वरळी आणि पणजी येथील नागरिकांना अन्नदान केले. मास्क आणि सॅनिटायझर्सचे वाटप केले. तयार जेवण, डाळ भात, साखर, चहा, मसाला असे साहित्य आम्ही वितरित केले. एकंदर दहा हजार लोकांना आम्ही सध्या मदत केली आहे. खानवेल रिसॉर्टचे व्यवस्थापकीय संचालक निर्मल जैन यांनी सांगितले की, सिल्वास येथे आमचे काम सुरु आहे. क्वारंटाईनसाठी आम्ही २०० खोल्या दिल्या आहेत. आमच्या असोसिएशनच्या माध्यमातून काम सुरु आहे. अन्नधान्य वितरित करण्यात येत आहे. आतापर्यंत सुमारे १ कोटी रुपयांचे अन्नधान्य वितरित करण्यात आले आहे. शिवाय आमच्याकडे बिहार, बंगालचे कर्मचारी आहेत. त्यांची व्यवस्था आम्ही आमच्याकडेच केली आहे. त्यांना त्यांच्या गावी जाऊ दिले नाही. सर्व कर्मचारी वर्गाचे पगार वेळेत दिले आहेत. कोणाचे पगार कापलेले नाहीत. गेट अ लाईफ फिटनेसचे संस्थापक अमित वशिष्ट यांनी सांगितले की आम्ही तीन प्रकारे मदत केली. कुठे पैशांची गरज होती. तिथे आम्ही गरजेनुसार मदत केली आहे. दुसरी मदत म्हणजे ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही. त्यांच्याकडे काहीच माहीती पोहचत नाही; अशांना आम्ही अन्नधान्य दिले आहेत. याद्वारे ३२१ कुटूंबांना मदत करण्यात आली आहे. आणि तिसरे म्हणजे आम्ही लोकांना मार्गदर्शन केले. वैद्यकीय मार्गदर्शन केले. मानसिक आधार महत्त्वाचा असतो. यासाठी आम्ही काम केले. आम्ही देशभरात काम केले आहे. यात मुंबई, दिल्ली, ठाणे यासारख्या शहरांचा समावेश आहे. आणि किमान ३० ते ४० हजार लोकांना आम्ही मदत केली आहे, असेही अमित यांनी सांगितले.
मालाड मालवणी येथील स्थानिक स्वयंसेवी संस्था युवा शक्ती सेना यांनीदेखील गरजुंना मदत केली. येथील झोपड्यांत जेवणाची मदत करतानाच पोलीसांना २०० मास्कचे वाटप करण्यात आले. बेस्ट बस कर्मचारी, आरटिओ, रिक्षाचालक यांनादेखील जेवणासाठी मदत करण्यात आली. गरजू कुटूंंबाना २०० रेशन किटसचेही वाटप करण्यात आले. फाईट फॉर राईट फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली मालाड पश्चिम विभागात १३० गरीब कुटुंबाना अन्नधान्य व गृह उपयोगी वस्तूंचे वाटप घरोघरी जाऊन फाउंडेशनचे सचिव मंथन पाटील, उपाध्यक्ष योगेश केणी, गणेश परदेशी, मनोज वाढेर, नितीन पाटील, प्रतीक शिर्वटकर, सिद्धेश राणे यांनी केले. विक्रोळीची दुर्गामाता नवरात्रोत्सव मंडळाने यंदाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात कोरोना रोगाच्या संकटसमयी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. सायन येथील लोकमान्य टिळक हॉस्पिटलच्या माध्यमातून आयोजित शिबिरात विक्रोळीतील अनेक नागरिकांनी रक्तदान केले. शिबिरात एकूण १२० बाटल्या रक्त जमा करण्यात आले, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष निमेश पारकर, प्रकाश सोनमळे व ललित कदम यांनी दिली.