लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दिवाळी पाडव्याच्या मुहुर्तावर अखेर राज्यातील सर्व प्रार्थनास्थळे भाविकांसाठी खुली झाली आहेत. मात्र, कोरोनासंदर्भातील नियमावलीचे पालन करून मंदिरे खुली करण्याला परवानगी मिळाल्याने भाविकांसाठी सर्वार्थाने ही दिवाळी भेट ठरली आहे.
पंढरपूर, कोल्हापूर, तुळजापूर, शिर्डी, शेगाव यासह राज्यभरातील मंदिरांमध्ये स्वच्छता करण्यात आली. प्रत्येक मंदिरात सॅनिटायझर, थर्मल स्क्रीनिंग आदी उपाययोजनांची पूर्तताही करण्यात आली. दर्शनासाठी प्रत्येकाला मास्क लावणे बंधनकारक असणार आहे. मंदिरांमध्ये दर्शनासाठी ऑनलाइन बुकिंग सक्तीचे केले आहे.
पंढरपूरमध्ये विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने भाविकांना पदस्पर्श दर्शनाऐवजी मुखदर्शन देण्याचे नियोजन केले आहे. यासाठी भाविकांनी ऑनलाइन पद्धतीने नाव नोंदणी करणे गरजेचे आहे. तर करवीरनिवासिनी अंबाबाई, जोतिबा मंदिरासह पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अधिपत्याखाली असलेली सर्व ३०४२ मंदिरे सकाळी ९ ते दुपारी १२ आणि दुपारी ४ ते सायंकाळी ७ या सहा तासांसाठी रोज खुली राहणार आहेत.
मुंबईतील सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी विशेष अॅपवर ऑनलाइन बुकिंग करावे लागेल. पहिल्या दिवशी एक हजार भाविकांना दर्शन घेता येणार आहे. शिर्डीतील साईदर्शनासाठीही ऑनलाइन बुकिंग करावे लागेल. मंदिरात हार, प्रसाद आदी पूजा साहित्य नेता येणार नाही. शेगावच्या संत गजानन महाराज मंदिरात प्रवेशासाठी मास्क बंधनकारक आहे.