Join us  

देवा, तुझा विसर न व्हावा

By admin | Published: September 27, 2015 5:28 AM

श्रीगणेशाची मनोभावे सेवा केल्यानंतर रविवारी गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात येणार आहे. गिरगाव, दादर आणि जुहू चौपाटीसह विविध ठिकाणचे तलाव आणि कृत्रिम विसर्जन स्थळांवर गणेशाला निरोप

मुंबई : श्रीगणेशाची मनोभावे सेवा केल्यानंतर रविवारी गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात येणार आहे. गिरगाव, दादर आणि जुहू चौपाटीसह विविध ठिकाणचे तलाव आणि कृत्रिम विसर्जन स्थळांवर गणेशाला निरोप देण्यासाठी गणेशभक्तांची अलोट गर्दी उसळणार आहे. अशावेळी विसर्जन निर्विघ्न पार पडावे; म्हणून महापालिकेसह पोलीसही सुसज्ज झाले असून, अनंत चतुर्दशीला मुंबापुरी श्रीगणेशाच्या भक्तीरंगात न्हाऊन निघणार आहे.गेल्या दहा दिवसांपासून मुंबई आणि उपनगरात सार्वजनिक मंडळांनी साकारलेले देखावे पाहण्यासाठी मुंबईकरांसह राज्यातील नागरिकांनी गर्दी केली होती. लालबागसह खेतवाडी आणि पूर्व-पश्चिम उपनगरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्ती, देखावे पाहण्यासाठी भक्तांची रिघ लागली होती. शनिवारी तर श्रीगणेशाचे दर्शन घेण्यासाठी ठिकठिकाणी दाखल झालेल्या भक्तांमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हाऊसफुल झाली होती. रविवारीही असाच उत्साह शहरासह उपनगरात पाहण्यास मिळणार असून, लाडक्या बाप्पाला निरोप देताना भक्तांचे डोळे अश्रूंनी दाटून येणार आहेत.महापालिका प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सर्वसाधारणपणे गिरगाव चौपाटीवर १३ हजारांवर सार्वजनिक व घरगुती गणपतींचे विसर्जन दरवर्षी होत असते. यावर्षी हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. गणेश विसर्जनासाठी येणारे वाहन भुसभुशीत रेतीमध्ये अडकू नये व विसर्जन सुरळीतपणे पार पडावे, याकरीता चौपाटीच्या किनाऱ्यावर १६८ जाड लोखंडी फळ्या ठेवण्यात येतात. यावर्षी विविध गणेश मंडळांच्या विनंतीनुसार ४० अतिरिक्त लोखंडी फळ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. दोन वर्षांपूर्वी मत्स्य दंशामुळे भाविकांना उपद्रव झाल्यामुळे मत्स्य दंशापासून भाविकांचे संरक्षण करण्यासाठी गणेश विसर्जनासाठी यावर्षी छोटया हातगाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच छोटया गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी जर्मन तराफ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. जीव सुरक्षारक्षकांसह एकूण ६ जर्मन तराफे, ६ बोटींची व्यवस्था करण्यात आली आहे. गणेश विसर्जनापूर्वी भक्तांनी अर्पण केलेले हार, फुले इत्यादी निर्माल्य जमा करण्यासाठी सात निर्माल्य कलशांची व्यवस्था करण्यात आली आहे. कलशामधील निर्माल्य वाहून नेण्यासाठी ७ कॉम्पॅक्टर, ११ मिनी कॉम्पॅक्टर व २४ डंपरची व्यवस्था करण्यात आली आहे.-----40,000पोलिसांचा फौजफाटादहा दिवस डोळ्यात तेल घालून मुंबई पोलिसांनी शहरात कडकोट बंदोबस्त ठेवला होता. रविवारी विसर्जनाच्या दिवशीदेखील शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तब्बल ४० हजार पोलिसांचा फौजफाटा रस्त्यावर दिसणार आहे. यात राज्य दहशतवादविरोधी दल, फोर्सवन, शीघ्र कृतीदल, एसआरपीएफ, बॉम्बशोधक व नाशक पथक या सुरक्षा यंत्रणांचा समावेश आहे.शहरातील विविध तलाव आणि चौपाट्यांवर रविवारी सार्वजनिक आणि घरगुती अशा तब्बल ३५ हजार गणेश मूर्तींचे विसर्जन होणार आहे. --------अल्लादिनचा जिन करणार बाप्पांवर पुष्पवृष्टी!बाप्पाच्या आगमनाची जशी धुमधडाक्यात तयारी होते, त्याचप्रमाणे लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबापुरी सज्ज होते आहे. ‘पुढच्या वर्षी लवकर या’ असे भक्तीभावाने सांगत बाप्पाचे निरनिराळ््या पद्धतीने विसर्जन केले जाणार आहे. या सगळ््यात गेली जवळपास ४६ वर्ष पुष्पवृष्टीची परंपरा जपणाऱ्या श्रॉफ बिल्डींगच्या भाविकांनी यंदा ‘अल्लादिनचा जिन’ साकारला आहे. या अल्लादिनच्या जिनच्या सहाय्याने बाप्पांवर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.लालबागच्या श्रॉफ बिल्डिंग पुष्पवृष्टी उत्सव मंडळ गेली अनेक वर्ष वेगवेगळ््या संकल्पांतून आकर्षक आणि वेगवेगळे संदेश देणाऱ्या देखाव्यातून पुष्पवृष्टी साकारण्यात येते. चिमुरड्यांपासून आजी-आजोबापर्यंत सर्वांनाच अल्लादिनचा चिराग (दिवा) आणि जिन परिचित आहे आणि त्यांची गोष्ट देखील माहित आहे. हा अल्लादिनचा जिन सांगितलेली कोणतीही इच्छा पूर्ण करतो. त्याचप्रमाणे या देखाव्यातून दुसऱ्याची इच्छा पूर्ण करणारा जिन स्वत: पुष्पवृष्टी करून गणपती बाप्पाकडे इच्छा प्रकट करणार आहे. राज्यातील दुष्काळाची भीषण परिस्थिती दूर करण्याची इच्छा व्यक्त करतानाचा हा देखावा साकारण्यात येत आहे.हा देखावा श्रॉफ बिल्डिंगमधील सर्व तरुण एकजुटीने तयार करत असून काथा, थर्माकॉल आणि वेगवेगळ््या रंगांचा वापर करून हा देखावा बनविण्याचे काम सुरू असल्याची माहिती चिंतन मोरये यांनी दिली. दरवर्षीप्रमाणे यंदाही साडेचारशे किलो फुले आणि १०० किलो गुलाल पुष्पवृष्टीकरिता वापरण्यात येणार आहे. आम्ही केवळ लालबागमधीलच नव्हे तर घरगुती गणपतीसह लालबाग पुलाखालून जाणाऱ्या सर्वच गणपती बाप्पांवर अनोख्या देखाव्यातून पुष्पवृष्टी करून निरोप देतो, असे चिंतन यांनी सांगितले.----------बाप्पाला निरोप देण्यासाठी सर्व यंत्रणांसोबतच आता महाराष्ट्र गणेशोत्सव महासंघही विसर्जनला सहाय्य करणार आहे. भरती-ओहोटीच्या वेळेस विसर्जित न झालेल्या मूर्तींचे महासंघाच्या कार्यकर्त्यांकडून पुनर्विसजन करण्यात येणार आहे. त्याकरिता, महासंघातर्फे स्वयंसेवी संस्था आणि मंडळांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन लवकरात लवकर व्हावे, याकरिता संघातर्फे सर्वतोपरी मदत करण्यात येणार आहे. तसेच, महासंघातर्फे मंडळांना मिरवणूका लवकरात लवकर काढून सायंकाळी ६ वाजण्यापूर्वी बंद करण्याची सूचना करण्यात आली आहे. शिवाय, मिरवणूकांमधील डीजेमुळे होणाऱ्या वाढत्या ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी डीजेचा वापर टाळून पारंपरिक ढोल वाद्यांचा वापर करण्याचे आवाहनही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना करण्यात आले आहे.शहर-उपनगरात विसर्जन मिरवणूकांचे व्यवस्थापन करण्यासाठी पोलीस आणि वाहतूक पोलीसांना सहकार्य करण्यासाठी महासंघाचे कार्यकर्ते मदत करतील. तसेच, जागोजागी पाणी वाटपाचा कार्यक्रमही करण्यात येईल. ज्या मंडळ आणि संस्थांना या उपक्रमांमध्ये सहभागी व्हायचे आहे, त्यांनी रविवार (ता.२७) दुपारी दोन वाजता गिरगाव चौपाटीवर येण्याचे आवाहन महासंघाचे कार्याध्यक्ष संजय यादवराव यांनी केले आहे. --------पोलिसांवरील हल्लेखोर गुंडमुंबई : घरगुती गणपती विसर्जनाच्या रात्री समतानगर आणि चारकोप पोलिसांवर हल्ला करणारे आरोपी हे सराईत गुंड असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून पुढे आले आहे. त्यांच्यावर दंगल, खंडणी, मारामारी आदी प्रकरणे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.या घटनेत हवालदार समीर पवार आणखी एकाला मारहाण करण्यात आली होती. प्रकरणी चारकोप पोलिसांनी आतापर्यत चौघाजणांना अटक केलेली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यापैकी सत्यप्रकाश सिंग हा मुख्य सूत्रधार असून तो राष्ट्रवादी कॉग्रेसच्या एका नेत्याचा अंगरक्षक म्हणून काम करतो. त्याच्यावर बोरीवली, एमएचबी, कस्तुरबा, मालवणी, कांदिवली तसेच वसई पोलीस ठाण्यात दंगल, खंडणी आदी प्रकरणी आठ गुन्हे दाखल आहेत. त्याच्या अन्य तीन साथीदारही गुन्हेगार पार्श्वभुमीचे आहेत. (प्रतिनिधी) (प्रतिनिधी)