'भगवंताने मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी दिली, सरकारचा अहंकार गळून पडला'
By महेश गलांडे | Published: November 14, 2020 06:18 PM2020-11-14T18:18:40+5:302020-11-14T18:19:54+5:30
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पाडव्यापासून राज्यातील मंदिरे खुली होणार असल्याचे सांगितले. त्यानंतर, भाजपा नेत्यांनी आनंद व्यक्त केला आहे, पण त्यासोबतच महाविकास आघाडी सरकारवर टीकाही करण्यास सुरुवात केलीय
मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील मंदिरे उघडण्याची मागणी विरोधकांकडून सातत्याने केली जात होती, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून योग्यवेळी धार्मिक स्थळं उघडण्याची परवानगी देऊ असं सरकारकडून सांगण्यात येत होते. अखेर राज्य सरकारने दिवाळीनिमित्त राज्यातील जनतेला मोठं गिफ्ट दिलं आहे. पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. त्यानंतरही, भाजपा नेत्यांकडून सरकारवर टीका करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पाडव्यापासून राज्यातील मंदिरे खुली होणार असल्याचे सांगितले. त्यानंतर, भाजपा नेत्यांनी आनंद व्यक्त केला आहे, पण त्यासोबतच महाविकास आघाडी सरकारवर टीकाही करण्यास सुरुवात केलीय. भाजपा आमदार राम कदम यांनी ट्विट करुन अखेर सरकार जागे झाल्याचं म्हटलंय. तसेच, जनतेचा हा मोठा विजय आहे. कुंभकरण निर्द्रावस्थेत असलेलं सरकार अखेर जागं झालंय, डरपोक सरकारचा हा मोठा पराभव आहे, असा टोलाही कदम यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे. तर, भाजपा अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी हा हिंदुत्त्वाचा विजय असल्याचं म्हटलंय.
हिंदुत्वाचा विजय झाला तर राज्य सरकारचा अहंकार गळून पडला. दिवाळीनंतर मंदिरे उघडणार असे म्हटलेल्या मुख्यमंत्र्यांना दिवाळीतच मंदिरे उघडण्याची भगवंताने सदबुद्धी दिली.
— Acharya Tushar Bhosale (@AcharyaBhosale) November 14, 2020
या लढ्यात सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील सर्व साधुसंतांचे आणि भाविक जनतेचे अभिनंदन !@BJP4Maharashtra@Dev_Fadnavispic.twitter.com/AurGg2HewL
भाजपा अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी व्हिडिओ शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली. गेल्या 4 महिन्यांपासून मंदिरं उघडण्यासाठी आम्ही जे आंदोलन केले त्याला यश आलं, हिंदुत्वाचा विजय झाला. दिवाळीनंतर नियमावली तयार करू आणि त्यानंतर मंदिरं खुली करू, असं म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पाडव्याच्या मुहूर्तावर दिवाळीतच मंदिरं उघडण्याची सद्बुद्धी भगवंताने दिली. हिंदुत्वाचा विजय झाला आणि सरकारचा अहंकार गळून पडला, हीच सांधू संतांची आणि भगवंताची ताकद आहे, अशा शब्दात तुषार भोसले यांनी सरकारवर टीका केली आहे.
कुंभकर्णी निद्रित असणारे अहंकारी #Maharashtrasarkar अखेर जागे झाले डरपोक सरकारचा मोठा पराभव! जनतेचा अखेर मोठा विजय! @CMOMaharashtra
— Ram Kadam - राम कदम (@ramkadam) November 14, 2020
दरम्यान, भाजपा नेत्यांकडून मंदिरं खुली करण्याची घोषणा केल्यानंतरही सरकारवर टीका करण्यात येत आहे. विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही सरकारलं उशीरा सूचलेलं शहाणपण असल्याचं म्हटलं आहे. तर, आचार्य तुषार भोसले यांनीही ठाकरे सरकारचा अहंकार गळून पडला असे म्हणत हिंदुत्वाचा मोठा विजय झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तुषार भोसले यांनी मंदिरे खुली करण्यासाठी आंदोलन केले होते.
काय म्हणाले मुख्यमंत्री
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यासंदर्भात नागरिकांना केलेल्या आवाहनात म्हटले की, दिवाळीचे मंगल पर्व सुरू झाले आहे. प्रथेप्रमाणे अभ्यंगस्नान आणि नरकासुर वधही झाला. नरकासुररूपी चिराटी फोडली असली तरी वर्षभर कोरोनारूपी नरकासुराने घातलेला धुमाकूळ विसरता येणार नाही. हा राक्षसही हळूहळू थंड पडत असला तरी बेसावध राहून चालणार नाही. राज्यातील जनतेने या काळात शिस्तीचे पालन केले. त्यामुळेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती हाताबाहेर गेली नाही. महाराष्ट्रावर साधू-संतांची, देव -देवतांची नेहमीच कृपा राहिली आहे. तरीही शिस्त, सावधगिरी म्हणून होळी, गणेशोत्सव, नवरात्र, पंढरीची वारीही झाली नाही. इतकेच नाही तर इतर धर्मीयांनीही ईद, माऊंट मेरीसारख्या जत्रांसंदर्भात शिस्त पाळलीच असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
हा फक्त सरकारी आदेश नसून 'श्रींची इच्छा
या काळात सर्वच प्रार्थनास्थळे बंदी असली तरी डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्ड बॉयच्या रूपाने 'देव' पांढऱ्या कपड्यांत भक्तांची काळजी वाहत होता. देव आपल्यातच होते, पण आता उद्याच्या पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरांसह सर्व प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र नियम, शिस्तीचे काटेकोर पालन सगळ्यांना करावेच लागेल. मुख्य म्हणजे प्रत्यक्ष प्रार्थनागृहांतील गर्दी टाळा व स्वतःबरोबर इतरांचे रक्षण करा. हा फक्त सरकारी आदेश नसून 'श्रीं ची इच्छा समजा! मंदिरात चपला बाहेर काढून प्रवेश करायचा असतो, पण तोंडावरील मास्क मात्र सक्तीचा आहे हे विसरू नका. मंदिरे उघडतील, इतर प्रार्थनास्थळे उघडतील. आपण शिस्त पाळली तरच देवांचे आशीर्वाद आपल्याला व महाराष्ट्राला मिळतील असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे.