मुंबई : टायर फुटून अपघात होणे, हे ‘देवाचे कृत्य’ नसून ‘मानवी निष्काळजीपणा’ आहे, असे निरीक्षण नोंदवित उच्च न्यायालयाने एका विमा कंपनीला मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना १२ लाखांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले.‘देवाचे कृत्य’चा शब्दकोशातील अर्थ कार्यरत असलेल्या अनियंत्रित शक्तीचे उदाहरण- गंभीर आणि अनपेक्षित नैसर्गिक घटना, ज्यासाठी मानव जबाबदार नसतो, असे नमूद करत न्या. एस. जी. डिगे यांच्या एकलपीठाने न्यू इंडिया अॅश्यूरन्स या विमा कंपनीचा दावा फेटाळला. कंपनीने असा दावा केला होता, की संबंधित अपघात हा देवाचे कृत्य असल्याने नुकसानभरपाईची रक्कम देण्यास विमा कंपनी जबाबदार नाही.
‘टायर फुटणे, हे देवाचे कृत्य नाही. ते मानवी निष्काळजीपणाचे कृत्य आहे. टायर फुटण्यास अनेक कारणे आहेत. जास्त फुगलेले टायर, कमी फुगलेले टायर, सेकंड-हँड टायर आणि तापमान यांचा त्यात समावेश आहे. वाहन मालक किंवा चालकाने प्रवास करण्यापूर्वी टायरची स्थिती तपासली पाहिजे,’ असे म्हणत न्यायालयाने मोटार अपघात दावा प्राधिकरणाने २०१७ मध्ये नुकसानभरपाईचा दिलेला आदेश योग्य ठरविला. अपघात झालेल्या व्यक्तीचे पालक, पत्नी आणि अल्पवयीन मुलाने केलेल्या दाव्यावर न्यायाधिकरणाने विमा कंपनीला चारही जणांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले होते. मात्र, कंपनीने त्याविरोधात उच्च न्यायालयात आव्हान दिले.
- कंपनीच्या दाव्यानुसार, मृत व्यक्ती त्याच्या मित्रासह कारने प्रवास करत होता. गाडीचा टायर फुटल्याने गाडी खाली पडली.
- कार चालविणारा मित्र वाचला आणि संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यामुळे टायर फुटणे, हे देवाचे कृत्य असून नुकसानभरपाई देण्यास कंपनी जबाबदार नाही. न्यायालयाने विमा कंपनीचा दावा फेटाळत चारही जणांना १२ लाख ४० हजार ०९६ रुपयांची नुकसानभरपाईची रक्कम देण्याचा आदेश दिला.