मुंबई : हजारो वर्षांपूर्वी महावीर जैन आणि ऋषीमुनींनी सांगितलेल्या मार्गावर आपण चाललो, तरच दुष्काळावर कायमस्वरूपी मात करता येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले . जैन इंटरनॅशनल आॅर्गनायझेशन (जिओ) संघटनेने बुधवारी रात्री आझाद मैदानात आयोजित केलेल्या प्रभू महावीर जन्म कल्याणक महामहोत्सवात मुख्यमंत्री म्हणाले की, रासायनिक खतांचा अधिक वापर करून आपण जमिनीची सुपीकता कमी केली. त्याचबरोबर प्राण्यांची हत्या करून अन्नसाखळीत बाधा निर्माण करत आहोत. मनुष्याने अन्नसाखळी तोडल्याने आता त्याला भयानक दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. देशी गाईच्या शेणाचा आणि गोमूत्राचा वापर करून कृषी उत्पन्नात वाढ होते, हे ऋषीमुनींनी हजारो वर्षांपूर्वीच सांगितले होते. त्यामुळे आता तरी त्यांच्या शिकवणीचा वापर करून भविष्यात दुष्काळावर मात करून शेतकऱ्यांचे प्रतिपालन करू, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.या वेळी मुंबईतील सर्व जैन संघांनी एकत्र येत श्री समस्त मुंबई जैन संघाच्या नावाने जलशिवार योजनेसाठी २४ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांना सुपुर्द केला. शिवाय दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्याच्या दृष्टीने दीर्घकालीन योजनेसाठी जिओ संघटनेकडून १ कोटी २४ लाख रुपयांचा निधी उपलब्ध केला जाईल, अशी घोषणाही संघटनेच्या प्रतिनिधींनी केली. महामहोत्सवात राजस्थानचे गृहमंत्री गुलाबचंद कटारिया, डॉ. भरत परमार, देशातील विविध उच्च न्यायालयांतील न्यायाधीशांनी उपस्थिती दर्शवली.(प्रतिनिधी)
भगवान महावीरांच्या शिकवणीने दुष्काळावर मात करू - मुख्यमंत्री
By admin | Published: April 21, 2016 3:09 AM