तापमानवाढीमुळे देवमाशांचे मृत्यू
By Admin | Published: June 26, 2015 10:50 PM2015-06-26T22:50:19+5:302015-06-26T22:50:19+5:30
रायगड जिल्ह्यात अलिबाग-रेवदंडा समुद्रकिनाऱ्याजवळ जखमी अवस्थेत वाहत आलेला ४२ फुटी महाकाय देवमाशाचे गुरुवारी निधन झाले. रेवदंडा समुद्र परिसरात
जयंत धुळप, अलिबाग
रायगड जिल्ह्यात अलिबाग-रेवदंडा समुद्रकिनाऱ्याजवळ जखमी अवस्थेत वाहत आलेला ४२ फुटी महाकाय देवमाशाचे गुरुवारी निधन झाले. रेवदंडा समुद्र परिसरात त्याच्यावर जिल्हा प्रशासनाकडून अंत्यसंस्कार करण्यात आले.
मृत देवमासा आणि कोकणाच्या सागरी किनारपट्टीत मृतावस्थेत निष्पन्न झालेले देवमासे, डॉल्फिन्स हे केवळ सागरी प्रदूषणाचे बळी आहेत असे म्हणता येणार नाही तर पृथ्वीवरील वाढत्या तापमानाचे (ग्लोबल वॉर्मिंग) सस्तन प्राण्यांवर होत असलेल्या विपरीत परिणामांचे निदर्शक असल्याचा निष्कर्ष गोव्याच्या राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेचे मुख्य वैज्ञानिक प्रो.बबन इंगोले यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला आहे.
जिवंत देवमासा किनारी भागात येवून त्याचा मृत्यू होणे हे चिंताजनक आहे. त्याचा मृत्यू वयपरत्वे नैसर्गिक होता की, अपघाती होता याचा शास्त्रीय अभ्यास होणे महत्त्वाचे असल्याचे सांगून प्रो. इंगोले म्हणाले, ग्लोबल वॉर्मिंगचे होणारे परिणाम सर्वप्रथम सस्तन प्राण्यांमध्ये दृश्य स्वरूपात दिसून येतात. माणसाव्यतिरिक्त इतर सस्तन प्राण्यांवर ग्लोबल वॉर्मिंगचे होणारे परिणाम समोर येण्यास वेळ लागतो. ग्लोबल वॉर्मिंगपासून बचाव करण्यासाठी मानव विविध उपाययोजना करतो, परंतु अशा प्रकारची उपाययोजना इतर सस्तन प्राण्यांना करून घेता येत नाही. त्यामुळे देवमासा व डॉल्फिनसारख्या पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील जलचराचा मृत्यू निदर्शनास आल्यास शासकीय स्तरावरील दखल घेण्याची प्रक्रिया गतिमान झाली आहे.मासेमारी पद्धतीत यांत्रिकीकरणामुळे झालेला बदल हे या अतिसंरक्षित जातींच्या मासे व प्राण्यांच्या मृत्यूस कारण ठरत असल्याचे प्रो.इंगोले यांनी सांगितले.