देवाच्या शंभरीची घडली आगळी वेगळी गोष्ट!
By अतुल कुलकर्णी | Published: October 2, 2023 06:59 AM2023-10-02T06:59:51+5:302023-10-02T07:00:21+5:30
१२ ऑगस्ट १९८३ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. या घटनेला चाळीस वर्षे झाली.
अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई
जा ने भी दो यारो हा सिनेमा कुंदन शहा आणि एनएफडीसी म्हणजे नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कार्पोरेशन या दोघांनी एकत्र येत बनवला. १२ ऑगस्ट १९८३ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. या घटनेला चाळीस वर्षे झाली. एक मृतदेह रंगमंचावर सुरू असलेल्या नाटकात नेला जातो. नाटकात महाभारत आणि रामायणाचे संवाद उलटसुलट करून म्हटले जातात. त्यातून प्रचंड गोंधळ उडतो आणि तो सिनेमा फुलत जातो. त्यानंतर २७ वर्षांनी म्हणजे २०१० मध्ये संतोष पवार यांनी लिहिलेले यदाकदाचित हे नाटक रंगमंचावर आले. रामायण आणि महाभारत या दोन नाटकांचा संदर्भ घेत तत्कालीन परिस्थितीवर भाष्य करणारे हे नाटक वादात सापडले. त्यावेळी संतोष पवार यांना प्रचंड टीका सहन करावी लागली.
४० वर्षांपूर्वी ‘जाने भी दो यारो’सारखा सिनेमा आला, तेव्हा कला, कलाकारांचे स्वातंत्र्य आणि व्यक्तिगत भावना यांची सांगड घालण्याची आम्हाला सवय नव्हती. त्यामुळे एक उत्तम चित्रपट तितक्याच निखळपणे आम्ही पाहू शकलो. मात्र, २७ वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. कलाकारांचे स्वातंत्र्य आम्हाला व्यक्तिगत हल्ल्यासारखे वाटू लागले. त्यामुळेच ‘यदाकदाचित’सारख्या नाटकासाठी संतोष पवार यांना प्रचंड टीका सहन करावी लागली. आता २०२३ मध्ये असा सिनेमा नव्याने कोणी बनवला किंवा असे नाटक जर रंगमंचावर आणले तर राज्यातच नाही तर देशभरात दंगली उसळतील. कारण अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कोणी एखादी कलाकृती केली तर ती आम्हाला आमच्या धर्मावर, आमच्या अस्तित्वावर घाला घातला, असे वाटू लागले आहे. आमच्या संवेदना संपून त्याची जागा अहंकाराने कधी घेतली, हेच आम्हाला कळेनासे झाले आहे. मात्र, इतकी टोकाची निराशावादी परिस्थिती आज नाही. यातूनही काहीतरी चांगले घडेल, असा आशावाद निर्माण करणारा सरता आठवडा होता. त्याला कारण ठरला सदाबहार अभिनेता देव आनंद यांचा शंभरावा वाढदिवस. ३ डिसेंबर २०११ रोजी देव आनंद यांचे निधन झाले. बारा वर्षानंतरही लोक या कलाकाराला विसरले नाहीत. शंभराव्या जयंतीचे औचित्य साधत एनएफडीसी आणि फिल्म हेरिटेज फाउंडेशन यांनी रिप्रोड्यूस केलेल्या ‘जाॅनी मेरा नाम’, ‘ज्वेल थीफ’, ‘सीआयडी’, ‘गाईड’ या सिनेमांचा आनंद २३ आणि २४ सप्टेंबर रोजी देशातील ३० शहरांमधे प्रेक्षकांनी लुटला. ओटीटीवर सिनेमे बघण्याच्या जमान्यात पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर देव आनंद यांच्या जुन्या चित्रपटांचा आनंद घेण्यासाठी मुंबईसह देशभरातील सिनेप्रेमींनी चित्रपटगृहात गर्दी केली. वरळीत एका कार्यक्रमात केक कापण्यात आला. नेहरू सेंटरमध्ये सायंकाळी देव आनंद जन्मशताब्दी सोहळा व संगीत रजनीचे आयोजन केले गेले. त्यासाठी ३०० चाहते देशाच्या विविध भागांमधून आले होते. झीनत अमान, राकेश बेदी आणि सिनेमॅटोग्राफर अदिप टंडन यांच्या मुख्य उपस्थितीत क्लॅप देऊन फिल्मी स्टाइलने कार्यक्रम सुरू झाला. तर मंदार कर्णिक यांच्या स्वरगंधार संस्थेने ‘सौ साल पहले’ नावाचा देव आनंद यांच्या चित्रपटातील गाण्यांचा कार्यक्रम करून या आठवड्याचा समारोप केला. या वेगवेगळ्या उपक्रमांना कोणीही एका सूत्रात बांधले नव्हते. प्रत्येकाने आपापल्या परीने देव आनंद यांच्या आठवणी जागवल्या. मंदारने केलेल्या कार्यक्रमात गाण्यांची अप्रतिम मैफल रसिकांना अनुभवता आली. अंबरीश मिश्र यांनी देव आनंद यांच्या अनेक आठवणी जाग्या केल्या. श्रीकांत नारायण, आलोक काटदरे, सोनाली कर्णिक, पल्लवी पारगावकर, सचिन अवस्थी या गायकांनी त्यांच्या चित्रपटातील अनेक अजरामर गाणी सादर केली.
सतत नकारात्मक वातावरणात जगण्याची सवय लागेल की काय, अशी परिस्थिती सर्वत्र असताना देव आनंद यांच्यासारखा एक कलावंत तुमच्या आमच्या मनात इतक्या वर्षानंतरही सकारात्मकता निर्माण करू शकतो, ही गोष्टच मुळात आगळीवेगळी आहे. हल्ली चित्रपट असो की नाटक प्रत्येकाच्या भावना कोणत्या क्षणी उफाळून येतील सांगता येत नाही.
काही चित्रपटदेखील प्रचारकी थाटाचे बनू लागले आहेत. भगव्या रंगाची बिकिनी याआधी असंख्य चित्रपटात अनेक अभिनेत्रींनी घातली. मात्र, शाहरुख खानच्या चित्रपटात दीपिका पदुकोणने ‘त्या’ रंगाची बिकिनी घातली म्हणून लगेच अनेकांच्या भावना दुखावल्या. असा काळ असताना देव आनंद आणि त्याचे बहुतांश संगीतकार, गायक, गीतकार आज या जगात जिवंत नसताना लोक त्यांच्या आठवणी काढतात. त्यांची गाणी ऐकतात. त्यांच्या कार्यक्रमाला रसिक गर्दी करतात. देव आनंद यांचे चित्रपट यू ट्युबवर उपलब्ध असताना चित्रपटगृहात जाऊन बघण्यासाठी लोक गर्दी करतात. याचा अर्थ अजूनही लोकांच्या मनात सकारात्मक भाव जिवंत आहेत. चांगले काहीतरी पाहण्याची, ऐकण्याची, बघण्याची लोकांची उर्मी कायम आहे. मुठभर लोक स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी भावना दुखावल्या म्हणून समाजात वातावरण बिघडवू शकतील. मात्र, गेल्या आठवड्यात देव आनंद यांच्या जन्मशताब्दीनिमित्त जे पाहायला मिळाले ते प्रचंड आशादायी आहे.
लोकांना राजकारण्यांशी फारसे घेणे-देणे उरलेले नाही. प्रचारकी चित्रपट, साहित्य काय आहे हे त्यांना आता उमजू लागले आहे. अंबरीश मिश्र म्हणाल्याप्रमाणे एका पिढीने देव आनंद, राज कपूर, दिलीप कुमार यांचा जमाना प्रत्यक्ष पाहिला. दुसऱ्या पिढीने तो त्यांच्या पुढच्या पिढीला ऐकवला आणि आता तो ठेवा पुढे नेण्याचे काम अशा कार्यक्रमांमधून होत आहे. हीच सगळ्यात जास्त आनंद देणारी गोष्ट आहे.