गोडसे समर्थकांनी केली पुन्हा जयंती साजरी
By admin | Published: May 21, 2015 02:15 AM2015-05-21T02:15:23+5:302015-05-21T02:15:23+5:30
गेल्या वर्षी पनवेल येथे नथुराम गोडसे याची जयंती साजरी केल्याने देशभरात वादंग माजले होते. गोडसे समर्थकांनी आज पुन्हा पनवेलमध्येच जयंती साजरी करून नव्या वादाला तोंंड फोडले आहे.
नवी मुंबई : गेल्या वर्षी पनवेल येथे नथुराम गोडसे याची जयंती साजरी केल्याने देशभरात वादंग माजले होते. गोडसे समर्थकांनी आज पुन्हा पनवेलमध्येच जयंती साजरी करून नव्या वादाला तोंंड फोडले आहे.
गेल्या वर्षी महाराणा प्रताप बटालियन या संस्थेने पनवेलमध्ये गोडसेची जयंती साजरी केली होती. त्यामुळे वाद निर्माण झाला होता. आयोजकांवर देशभरातून टीकेची झोड उठविण्यात आली होती. काँग्रेसने तर या आयोजनाचा धिक्कार करीत आयोजकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतरही आज पुन्हा या संस्थेने याच परिसरात गोडसे याची जयंती साजरी केल्याने हा वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नवीन पनवेल येथील पृथ्वी हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला अखिल भारतीय हिंदू महासभेचे प्रवक्ता प्रमोद पंडित जोशी, प्रो. माधव पांडे, शेखर पारंगे, सचिन खुले, डी. एन. यादव प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.
भारतात आज हिंदू अल्पसंख्याक होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे हिंदू धर्माचे रक्षण करण्यासाठी गोडसेसारख्या युवकांची फौज निर्माण होण्याची गरज असल्याचे मत या वेळी वक्त्यांनी मांडले. तर संसदेत नथुराम गोडसेचा पुतळा उभारून त्याला भारतरत्नने सन्मानित करावे, अशी वादग्रस्त मागणी महाराणा प्रताप बटालियनचे अध्यक्ष व आयोजक अजयसिंह सेंगर यांनी यावेळी केली.