नवी मुंबई : महाराणा प्रताप बटालियनच्यावतीने पनवेलमध्ये महाराणा प्रताप जयंती व आनंदोत्सव कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या ठिकाणी वक्त्यांनी फाळणीसाठी महात्मा गांधीजींना दोषी धरत पुन्हा नथुराम गोडसेचे गोडवे गायले आहेत. पनवेलमध्ये यापूर्वी नथुराम गोडसेच्या जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्याचे पडसाद लोकसभेमध्येही उमटले होते. यानंतर शुक्रवारी पुन्हा महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त त्याच संस्थेने महाराणा प्रताप जयंती व आनंदोत्सव कार्यक्रम आयोजित केला होता. गांधीजींमुळेच देशाची फाळणी झाली. अनेक हिंदू नागरिकांची कत्तल झाली. यामुळेच नथुराम गोडसेने गांधीजींना संपविले. यामुळे हा दिवस आम्ही आनंदोत्सव म्हणून साजरा करतो, असे मत अजय सिंह चौहाण यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी वक्त्यांनी गोडसेच्या कृतीचे समर्थन करून त्याला देशभक्त संबोधले. नवीन पनवेल सेक्टर १ मधील पृथ्वी हॉलमध्ये हा कार्यक्रम साजरा झाला. ब्रम्हजीतसिंह व इतर मान्यवर उपस्थित होते. यामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)
पनवेलमध्ये पुन्हा गोडसेचे गोडवे
By admin | Published: January 31, 2015 2:26 AM