डॉक्टरकडे जाण्याआधी फ्रॅक्चरच्या दुखण्यावर औषध
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 06:43 AM2019-04-18T06:43:07+5:302019-04-18T06:43:16+5:30
अपघातात किंवा दुर्घटनेत शरीरातील एखाद्या भागला, हाडाला दुखापत होते.
- सीमा महांगडे
मुंबई : अपघातात किंवा दुर्घटनेत शरीरातील एखाद्या भागला, हाडाला दुखापत होते. ते हाड नाजूक, ठिसूळ होते. घाईगडबडीत अधिक हालचाल झाल्याने हाडाला फ्रॅक्चर होण्याची भीती असते. त्यामुळे डॉक्टरकडे जाण्यापूर्वीच प्राथमिक उपचार मिळावेत यासाठी पुण्याच्या डॉक्टर मयूर सणस यांनी स्प्लिंट तयार केले आहे. यामुळे दुखणाऱ्या भागाची हालचाल नियंत्रित केली जाऊन वेदना कमी केल्या जाऊ शकतात आणि होणारी हानीही टाळली जाऊ शकते, असे डॉ. सणस यांनी सांगितले.
आयआयटी बॉम्बे आणि बेटेक म्हणजेच बायोमेडिकल इंजिनीअरिंग अॅण्ड टेक्नोलॉजी (इन्क्युबेशन) सेंटरतर्फे आयोजित या प्रदर्शनात डॉ. सणस यांनी संशोधन केलेल्या स्प्लिंटचे सादरीकरण करण्यात आले. डॉक्टरांकडे जायच्या आधी दुखणे कमी करण्यासाठी वापरण्यात येणारे हे स्प्लिंट प्लास्टर आॅफ पॅरिसच्या हायब्रीड कम्पोझिटपासून बनविले आहे. त्याचा कोणताही दूरगामी परिणाम आतापर्यंतच्या वापराने दिसून आला नसल्याचेही डॉ. सणस यांनी स्पष्ट केले. या स्प्लिंटच्या प्राथमिक चाचण्या यशस्वीपणे पार पडल्या आहेत. आता स्किन इरिटेशन, स्किन सेन्सिटायझेशन आदी काही चाचण्या शिल्लक असल्याचे डॉ. सणस यांनी सांगितले.
>येथे स्प्लिंटचा
वापर करणे शक्य
अपघातात किंवा दुर्घटनेत शरीरातील एखाद्या भागाला, हाडाला दुखापत झाल्यानंतर होणाºया फ्रॅक्चरच्या आधीचे दुखणे, हाताची हालचाल नियंत्रित करण्यासाठी हे स्प्लिंट वापरता येणार आहे. त्यांच्या या स्प्लिंटला नवी दिल्ली येथील बीआयआरएसीतर्फे प्रतिष्ठेचा समजला जाणारा ५० लाख रुपयांचा बायोटेक्नोलॉजी इग्निशन ग्रँट पुरस्कार मिळाला आहे.
दरम्यान, या प्रदर्शनात २० नावीन्यपूर्ण वैद्यकीय उपकरणे सादर करण्यात आली.