Join us  

पिकनिकला जाताय, घरी कोणी वाट पाहतंय...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2023 9:44 AM

मान्सून पर्यटनाचा आनंद घेताना आपत्कालीन घटनांत पर्यटकांचा जीव जातो.

सारंग कुर्वे, प्रमुख उपसमादेशक, एनडीआरएफ

मान्सून पर्यटनाचा आनंद घेताना आपत्कालीन घटनांत पर्यटकांचा जीव जातो. अतिउत्साह किंवा सेल्फी घेण्याच्या हव्यासापायी अनेक घटनांत तरुण जखमी होतात अथवा मृत्युमुखी पडत आहेत. पावसाळी पिकनिक करताना पर्यटकांनी स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सूचना लक्षात घेण्याबरोबरच स्वत:च्या उत्साहालाही थोडा लगाम घातला पाहिजे.

सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. त्यामुळे तरुणाई मान्सून पिकनिक, समुद्रकिनारे, चौपाटी अशा ठिकाणी गेली की, अतिउत्साहात असते. फोटो काढणे, सेल्फी काढणे आणि ते सोशल मीडियावर अपलोड करण्यासाठी जीवाची धडपड केली जाते. मात्र तरुणाईने स्वत:वर नियंत्रण ठेवले पाहिजे. कारण राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) प्रत्येक ठिकाणी जाईल, असे होत नाही. पहिल्यांदा स्थानिक प्रशासन कामी येते. एनडीआरएफ तिसऱ्या स्तरावर काम करते. म्हणजे आपत्कालीन घटनेत मदत करते. महापालिका किंवा तत्सम ठिकाणांवरील यंत्रणा जेव्हा धोक्याच्या सूचना देते तेव्हा त्या पर्यटकांनी पाळल्या पाहिजेत. समुद्रकिनारे, चौपाटी, पर्यटन स्थळे, गडकिल्ले अशा ठिकाणी सूचना दिलेल्या असतात. त्यांचे पालन न करणे ही आपली मानसिकता असते. ट्रेंड आहे किंवा सेल्फी काढून सोशल मीडियावर फोटो टाकायचा आहे म्हणून आपला जीव धोक्यात घालता कामा नये.

आम्ही रायगडच्या दुर्घटनेत मदत करत आहोत. मुंबईत आम्ही कांजुरमार्ग आणि दरडीच्या ठिकाणी रेकी केली. मात्र, स्थानिकांनीही काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. समुद्रकिनारी एनडीआरएफ असेलच असे नाही. २०१७ साली आम्ही समुद्रावर होतो. मात्र, आता तिकडे पालिका आहे. उर्वरित यंत्रणा आहेत. समुद्रकिनारी भरती-ओहोटी असते. बाहेरून येणाऱ्या लोकांना समुद्राची तेवढी माहिती नसते. अशावेळी स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे त्यांनी पालन केले पाहिजे. समुद्रकिनारी, चौपाटीवर भरतीवेळी काळजी घ्यावी. पर्यटकांनी स्वत:वर ताबा ठेवला पाहिजे आणि पर्यटनाचा आनंद घेतानाच इतरांना त्रास होणार नाही, याची काळजीही घेतली पाहिजे.