बाहेरगावी जाताय... आधी घर सांभाळा...?
By admin | Published: April 4, 2015 10:49 PM2015-04-04T22:49:13+5:302015-04-04T22:49:13+5:30
नुकत्याच परीक्षा संपल्याने शाळा आणि महाविद्यालयांना सुट्या लागल्या आहेत. शिवाय, लग्नकार्याचा हंगाम असल्याने गावांकडे जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
शहाड : नुकत्याच परीक्षा संपल्याने शाळा आणि महाविद्यालयांना सुट्या लागल्या आहेत. शिवाय, लग्नकार्याचा हंगाम असल्याने गावांकडे जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तेव्हा याच संधीचा फायदा घेत बंद घर पाहून घरफोडी करणाऱ्यांचा आणि भुरट्या चोरांचा उपद्रव वाढला आहे. या महिनाभरात कल्याण-डोंबिवलीसह जिल्ह्यातील विविध चोरी व घरफोडीच्या घटना पाहता नागरिकांनी बाहेरगावी जाताना आधी आपल्या घराची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
मुंबईसह उपनगरांत नोकरी, उद्योग व व्यवसायाच्या निमित्ताने राज्य-परराज्यांतून लाखो चाकरमानी स्थायिक झाले आहेत. नुकत्याच दहावी-बारावीसह पदवी-पदव्युत्तर आणि इतर सर्व शाखांच्या परीक्षा जवळपास संपल्या आहेत. शिवाय, गावाकडे नात्यागोत्यातील लग्नकार्य असेल तर जावेच लागते. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या गावाकडे जाण्याची ओढ ही असतेच. तेव्हा एप्रिल व मे महिन्यात गावाकडे जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. याच संधीचा फायदा घेऊन घरफोडी, घरात चोरी होऊ शकते. कारण, गेल्या महिनाभरात कल्याण-डोंबिवली आणि जिल्ह्याच्या विविध भागांत भुरट्या चोऱ्या, घरफोडी व लुटीच्या घटना पाहता आपल्या घराची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
चोरी, घरफोडी व इतर गुन्ह्यांसह कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी पोलीस नेहमी प्रयत्नशील असतात. यासाठी गस्ती पथक कार्यरत आहेत. तरीही, नागरिकांनी बाहेरगावी जाताना आपल्या घराबाबत योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. तर जे बाहेरगावी जाणार नाहीत, त्यांनी परिसरात लक्ष ठेवून सहकार्य करावे.
- विजय खेडकर,
सहा. पोलीस निरीक्षक (गुन्हे),
महात्मा फुले पोलीस ठाणे,
कल्याण
४गावी जाताना घराचे दरवाजे, खिडक्या व्यवस्थित बंद असल्याची/ केल्याची खात्री करा.
४आपण गावी जात असल्याची कल्पना शेजाऱ्यांना द्या. शिवाय, आपली आवश्यक ती माहिती त्यांच्याकडे असू द्या. उदा. मोबाइल नंबर, कार्यालयाचा पत्ता, जवळच्या नातेवाइकांचा पत्ता इ.
४जास्त काळ बाहेरगावी जायचे असल्यास नातेवाइकांना, शेजाऱ्यांना घर सांभाळायला/ घरी झोपायला सांगा.
४घरातील पैसे, दागिने व मौल्यवान चीजवस्तू बँकेच्या लॉकरमध्ये ठेवा. घराच्या चाव्या सोबत घेऊन जा.
४नोकरांबाबत काळजी घ्या
४घरातील नोकरांचे संपूर्ण नाव, गाव, वय, राहण्याचा पत्ता, पासपोर्ट आकाराचा फोटो, बोटाचे ठसे व संपर्क क्रमांक घेऊन ठेवा. शिवाय, ही माहिती जवळच्या पोलीस ठाण्यातही द्या.
४नोकराचे मूळ गाव, राहण्याचे ठिकाण, कुटुंबीयांची माहिती, त्याला ओळखणाऱ्या दोघांची वरीलप्रमाणे संपूर्ण माहिती आपल्याकडे असू द्या.
४आणि महत्त्वाचे म्हणजे घरातील नोकरांसमोर आपल्या पैसे, दागिने अर्थात संपत्तीचे प्रदर्शन टाळावे. कपाटाच्या चाव्या नोकराच्या हाती लागणार नाही, याची काळजी घ्यावी.