Join us

पालिकेत कामासाठी जाताय ? साहेब वेळेवर आले तर नशीब

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 12:18 PM

बायोमेट्रिक बंधनकारक केल्याने यावे लागते कार्यालयात

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : अनेक दिवसांपासून रखडलेली विविध प्रशासकीय कामे मार्गी लावण्यासाठी नागरिक पालिकेत अधिकाऱ्यांना भेटायला येतात, पण साहेब आज नाहीत, साहेब सुट्टीवर आहेत, साहेब उशिरा येणार आहेत अशी कारणे नागरिकांना सांगितली जातात; परंतु बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक केल्यामुळे पालिका कर्मचारी, अधिकाऱ्यांना  कार्यालयात हजर राहावेच लागते.

सुट्टीचे दिवस, जरा कळ सोसा 

शनिवार, रविवार पाठोपाठ १५ ऑगस्ट मंगळवार आणि १६ ऑगस्ट बुधवार असे दोन दिवस सुट्टीचे आल्याने पालिकाही बंद राहणार आहे. त्यामुळे कर्मचारी आणि अधिकारी लॉंग सुटीवर जाण्याच्या बेतात असून कामासाठी सर्वसामान्यांना जरा कळ सोसावी लागणार आहे.

बैठकीमुळे भेट होत नाही

कर्मचारी, अधिकारी वेळेत कार्यालयात उपस्थित असूनही अनेकदा सर्वसामान्यांची भेट होत नाही. प्रशासकीय विभागातील इतर अधिकाऱ्यांसह बैठक असल्यामुळे भेट रखडते.  या मीटिंग तासन्तास चालतात व सर्वसामान्यांना वाट बघावी लागते.

३ ते ५ या वेळेत भेटणे शक्य

सोमवार ते शुक्रवार या काळात सकाळी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे  बायोमेट्रिक पद्धतीने पंचिंग होत असले तरी अधिकाऱ्यांना भेटायला मिळेलच असे नाही. सर्वसामान्य व्यक्ती ३ ते ५ या वेळेत अधिकाऱ्यांची भेट घेऊ शकतात. त्यासाठी आल्यानंतर अधिकाऱ्यांची वेळ व परवानगी घ्यावी लागते.

अधिकारी ऑन फिल्ड

काही अधिकारी, कर्मचारी सकाळी पालिकेत येतात. काही वेळानंतर  ते साइट व्हिजिटसाठी कार्यालयाबाहेर निघून जातात. या ऑन फिल्ड वर्कमुळे त्यांना भेटायला आलेल्या अभ्यंगत आणि सर्वसामान्य नागरिकांची खेप वाया जाते.

दोन दिवस सुट्ट्या

मुंबई महापालिकेतील कर्मचारी व अधिकाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच आठवड्याला दोन दिवस सुट्ट्या व पाच दिवस काम करावे लागते. या कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी लावावी लागत असल्यामुळे त्यांना कामाचे आठ तास भरावेच लागतात. बायोमेट्रिक हजेरी लावली नाही तर कर्मचाऱ्यांचा पगार कापला जातो.

 

टॅग्स :मुंबई महानगरपालिका