Join us

महापालिका, रेल्वेत समन्वय नसल्याने गोखले, बर्फीवाला पूल झाले वर खाली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 8:35 AM

सत्यशोधन समितीच्या अहवालातील निष्कर्ष

मुंबई : अंधेरी येथील गोखले पूल आणि बर्फीवाला पूल यांच्यातील पातळी वरखाली झाल्यामुळे पालिका प्रशासनाचे जे हसे झाले आणि मनस्ताप झाला त्याच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या सत्यशोधन समितीचा अहवाल आयुक्तांना सादर झाला आहे. पालिका आणि  रेल्वे अधिकारी यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे पुलांची पातळी वर खाली झाल्याचा निष्कर्ष या अहवालात काढण्यात आला आहे.  या चुकीसाठी संबंधित अधिकाऱ्यांना पालिका प्रशासन जाब विचारणार आहे.  

या दोन पुलांच्या जोडणीत दोन मीटरचे अंतर निर्माण झाल्यामुळे बर्फीवाला पूल बंद ठेवण्यात आला. पालिकेने पुन्हा आयआयटी, व्हीजेटीआयद्वारे आराखडा तयार केला. पालिकेवर जोरदार टीका झाल्यानंतर आयुक्त भूषण गगराणी यांनी चौकशीसाठी अतिरिक्त आयुक्त अमित सैनी यांची नेमणूक केली होती.   

यापुढे तरी समन्वय राहणार का? 

पालिका, रेल्वे अधिकाऱ्यांतील असमन्वयामुळे पुलाच्या कामाचे नियोजन फसले आणि अनेक महिने वाया गेले. या दरम्यान रहिवाशांना वाहतूककोंडीचा त्रासही सहन करावा लागला. यापुढे कोणत्याही प्रकल्पात नियोजनातील अभाव राहू नये हा या अहवालामागील उद्देश होता. त्यामुळे पुढील प्रकल्पांच्या नियोजनात अधिकाऱ्यांचा समन्वय राहणार का? तो राहण्यासाठी पालिका काय पावले उचलणार याकडे लक्ष असणार आहे. 

पालिका आणि रेल्वे अधिकाऱ्यांतील असमन्वय सत्यशोधन समिती अहवालात अधोरेखित करण्यात आला आहे. गोखले आणि बर्फीवाला पुलांतील हा निष्काळजीपणा इतके दिवस दुर्लक्षित कसा राहिला, याची विचारणा संबंधित अधिकाऱ्यांकडे करण्यात येईल - भूषण गगराणी, आयुक्त, मुंबई महानगरपालिका 

टॅग्स :मुंबईअंधेरीपश्चिम रेल्वे