मुंबई : अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणारा महत्त्वपूर्ण गोखले पूल वाहतुकीसाठी बंद केल्यानंतर अंधेरीसह वांद्रे ते दहिसरपर्यंतच्या परिसरातील अनेक मार्गांवर अभूतपूर्व वाहतूक कोंडी होत आहे. एरवी १५ ते २० मिनिटे लागणाऱ्या अंतरासाठी दीड ते दोन तासांचा वेळ खर्ची घालावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर तेथील स्थानिक नागरिकांनी आता आयुक्तांना पत्र लिहिले असून, त्यांच्याकडे या पुलाच्या कामाची दैनंदिन स्थितीचा आढावा पालिकेने द्यावा, अशी मागणी केली आहे. सोबतच गोखले पुलाचे काम ठरलेल्या वेळेत पूर्ण करून घेईल यासाठी एक विशेष अधिकारी नेमावा, अशी मागणीदेखील केली आहे.
गोखले पुलाच्या पादचारी भाग दि. ३ जुलै २०१८ रोजी पडल्यानंतर महापालिकेने पुलाच्या कामासंदर्भात निविदा काढली. पालिकेने रेल्वेच्या अखत्यारीतील कामासाठी पाठपुरावा करत पत्र २०१८ मध्ये दिल्याचे सांगितले जाते. त्यानंतर रेल्वेने पालिकेच्या अहवालानंतर २०२२ मध्ये या कामासाठी पुढाकार घेतला. दरम्यानच्या काळात चार वर्षांत काहीही झाले नाही, हा कालावधी अक्षरशः वाया गेला. त्यानंतर २०२२ मध्ये पुलाचे काम सुरू झाल्यानंतर त्यात ही अडचणी आल्याने ते वेळेत पूर्ण झाले नाही. टाईनंतर अनेक तांत्रिक बाबींमुळे पुलाची मार्गिका सुरू करण्याची तारीख पुढे ढकलण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे या सर्व प्रक्रियेदरम्यान पूल विभागातील मुख्य अभियंते आणि इतर अधिकारी, पायाभूत सुविधांचे उपायुक्त या सगळ्यांचा सहभाग होता तरी तांत्रिक अडचणींमुळे अद्याप पूल वेळेत सुरू होऊ शकलेला नाही.
मंगळवारी अखेर गर्डर जागेवर स्थापित :
गोखले पुलाचे गर्डर लॉंचिंगचे काम अखेर दि. २३ जानेवारी मंगळवारी पूर्ण झाले असून, तो स्थापित करण्यात आला आहे मात्र त्यात ही अनेक समस्या असल्याचे स्थानिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
स्थानिकांनी उपस्थित केलेली निरीक्षणे आणि प्रश्न :
अद्याप रेल्वे आणि पालिका पुलाला जोडणारा पूल बांधणे बाकी आहे
पादचाऱ्यांसाठी गोखले पुलावर कोणतेही नियोजन अद्याप का नाही?
पहिली टप्प्यात गोखले पुलाची मार्गिका केवळ गाड्यांसाठी खुली होईल मग बसेससाठी ती केव्ह अवली होणार?
दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू झालेले दिसत नाही ते सुरू केव्हा होणार आणि कधी पूर्ण केव्हा होणार?