Join us  

गोखले पूल बंद! ४८ तासांत परिसरातील पर्यायी मार्गांवर पुनर्पृष्ठीकरणाचे काम पूर्ण

By सचिन लुंगसे | Published: November 11, 2022 5:31 PM

रात्रीच्या वेळेस अतिरिक्त यंत्रणा नेमून कार्यवाही

मुंबई : अंधेरी पूर्व व पश्चिमेला जोडणारा गोपाळकृष्ण गोखले रेल्वे पूल जीर्णावस्थेमुळे बंद केल्यानंतर वाहतुकीसाठी उपलब्ध असलेल्या पर्यायी रस्त्यांवरील महत्त्वाच्या जागी पुनर्पृष्ठीकरणाचे (Resurfacing) काम अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्या निर्देशानुसार महानगरपालिका प्रशासनाने ४८ तासांत पूर्ण केले आहे. विशेष म्हणजे, अतिशय वर्दळीच्या या परिसरातील वाहतुकीला अडथळा होवू नये म्हणून पुनर्पृष्ठीकरणाचे काम रात्रीच्या वेळेत आणि अतिरिक्त यंत्रणा नेमून पूर्ण करण्यात आले आहे. दरम्यान, या पर्यायी रस्त्यांवर इतरही ठिकाणी आवश्यक ती कामे करुन वाहतूक सुसह्य करण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत.

अंधेरीतील गोपाळकृष्ण गोखले रेल्वे पुलाचे संरचनात्मक लेखा परीक्षण करण्यात आल्यानंतर सल्लागारांच्या मतानुसार व पुलाची जीर्ण होत असलेली परिस्थिती लक्षात घेता प्रत्यक्ष पाहणीनंतर सदर पूल सोमवार ७ नोव्हेंबर २०२२ पासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. असे असले तरी वाहतुकीसाठी विविध पर्यायी रस्ते उपलब्ध असून त्यांचा नागरिकांनी वापर करावा यासाठी फलकांच्या (होर्डिंग्ज) माध्यमातून जनजागृती देखील करण्यात आली आहे. 

पूल बंद झाल्यामुळे पर्यायी मार्गांवर वाढणारी वाहनांची संख्या व वर्दळ लक्षात घेता वाहतूक सुलभरित्या सुरु राहण्यासाठी आवश्यक तिथे तातडीने रस्त्यांवर पुनर्पृष्ठीकरण करावे, हे काम रात्री करावे, जेणेकरुन वाहतुकीला बाधा पोहोचणार नाही, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी दिले होते. त्यानुसार महानगरपालिका प्रशासनाने ४८ तासांच्या आत या परिसरातील पर्यायी मार्गांवर महत्त्वाच्या जागांवर पुनर्पृष्ठीकरणाचे काम पूर्ण केले आहे. त्यासाठी अतिरिक्त यंत्रणा नेमून व रात्रीच्या वेळी कामे करुन ठरवून दिलेल्या मुदतीत हे काम तडीस नेण्यात आले आहे. यामध्ये एच/पूर्व, के/पूर्व, के/पश्चिम, पी/दक्षिण या सर्व विभाग कार्यालयांसह रस्ते विभागाने समन्वय राखून काम पूर्ण केले आहे.

एच/पूर्व विभागात वाकोलामधील पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळील नेहरु रोड, मिलिटरी कॅम्प रस्ता, खार भूयारी मार्ग येथे पुनर्पृष्ठीकरण करण्यात आले आहे. नेहरु रोड हा सांताक्रूझ रेल्वे स्थानक ते पश्चिम द्रुतगती महामार्ग, मुंबई विद्यापीठ, कलिना व वाकोला मधील संरक्षण खात्याचा परिसर यांना जोडणारा मुख्य रस्ता आहे. तर खार भूयारी मार्ग हा पूर्व-पश्चिम परिसरांना जोडण्यासाठी महत्त्वाचा आहे. तसेच, मिलिटरी रोडवरुन विमानतळाच्या दिशेने महत्त्वाच्या व्यक्तिंना जाण्यासाठी वापरात येतो.

के/पूर्व विभागाचा विचार करता, गोखले पूल ते महामार्ग व पुढे सहार रोड, अंधेरी स्थानक, तेली गल्ली यांना जोडणाऱया एन. एस. फडके मार्गावरही महत्त्वाच्या ठिकाणांवर पुनर्पृष्ठीकरण पूर्ण करण्यात आले आहे. अंधेरी पूर्वमधील महत्त्वाचे व्यावसायिक परिसर जोडणारा हा समांतर रस्ता आहे. 

के/पश्चिम विभागामध्ये जोगेश्वरी - विक्रोळी जोडरस्ता पूल व स्वामी विवेकानंद मार्गावरील जंक्शन येथे पुनर्पृष्ठीकरण पूर्ण करण्यात आले आहे. सदरचे जंक्शन हे कायमस्वरुपीच्या वर्दळीचे आहे. मॉल्स्, व्यापारी संकूले आणि जोगेश्वरी स्थानकाजवळचा हा भाग असल्याने या परिसरात नेहमी वाहतूक जास्त असते. गोखले पूल बंद झाल्यानंतर अंधेरीच्या उत्तर टोकाकडे पूर्व-पश्चिम जोडणीसाठी सदर जंक्शन रस्ता हा महत्त्वाचा पर्याय आहे.

पी/दक्षिण विभागातील स्वामी विवेकानंद मार्ग व मृणालताई गोरे उड्डाणपूल यांच्या जंक्शनवर देखील पुनर्पृष्ठीकरण केले आहे. पश्चिम द्रुतगती महामार्ग व स्वामी विवेकानंद रस्त्याला जोडणारा मृणालताई गोरे उड्डाणपूल हा उत्तरेकडून येणारी वाहतूक अंधेरी-पार्ले पश्चिम भागांकडे सुरळीतपणे जाण्यासाठी महत्त्वाचा ठरणारा आहे. तसेच अंधेरी, पार्ले भागामधून मुंबईबाहेर जाणाऱया वाहनांसाठी देखील हाच उड्डाणपूल महत्त्वाचा पर्याय आहे. 

सर्व पर्यायी मार्गांवर महत्त्वाच्या ठिकाणांवर पुनर्पृष्ठीकरण करण्यात आल्याने तसेच वाहतूक पोलिसांच्या मदतीला अतिरिक्त मनुष्यबळ नेमण्यात आल्याने अंधेरी परिसरातील वाहतूक कोंडी दूर वाहून वाहतूक सुरळीत होण्यासाठी निश्चितच हातभार लागणार आहे. दरम्यान, महत्त्वाच्या जागांवरचे पुनर्पृष्ठीकरण केल्यानंतर आता सर्व पर्यायी रस्ते सुस्थितीत राखून वाहतूक सुसह्य होण्यासाठी प्रशासनाकडून कामे हाती घेण्यात येत आहेत, ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देशही अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी दिले आहेत.