गोखले पुलाची डेडलाइन पुन्हा एकदा हुकली; फेब्रुवारीअखेर काम पूर्ण करण्याच्या आयुक्तांच्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 09:46 AM2024-01-18T09:46:46+5:302024-01-18T09:49:22+5:30
पहिल्या टप्प्यातील काम फेब्रुवारीअखेर पूर्ण करा, आयुक्तांच्या सूचना.
मुंबई: येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत गोखले पुलाची एका मार्गिका मुंबईकरांसाठी खुली करण्याच्या पालिकेच्या नियोजनाला पुन्हा लेटमार्क लागला आहे. पुलाचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण करून पुलाचा नागरिकांसाठी लवकर उपलब्ध करून देण्याच्या सूचना आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. काही तांत्रिक बाबींमुळे या पुलाच्या कामांसाठी अतिरिक्त कालावधी लागत असला तरीही फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ते पूर्ण करावे असे त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र या सगळ्यांमुळे गोखले पुलाची डेडलाईन पुन्हा एकदा हुकली आहे.
गोखले पुलाच्या कामाच्या प्रगतीबाबत सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी महानगरपालिका मुख्यालयात आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी बैठक पार पडली. या बैठकीला आमदार अमीत साटम, अतिरिक्त महानगरपालिका प्रकल्प आयुक्त पी. वेलरासू, पायाभूत सुविधांचे उप आयुक्त उल्हास महाले, पूल विभागाचे प्रमुख अभियंता विवेक कल्याणकर, पश्चिम रेल्वेचे अधिकारी, प्रकल्प सल्लागार, तांत्रिक पर्यवेक्षण सल्लागार मेसर्स राईट्स लिमिटेड, कंत्राटदार उपस्थित होते. २५ फेब्रुवारीपर्यंत एक मार्गिका खुली करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जाणार आहे.
अशी वाढली ‘तारीख पे तारीख’-
पहिला मुहूर्त - मे ३१
दुसरा मुहूर्त - जुलै ३१
तिसरा मुहूर्त - सप्टेंबर ४
तिसरा मुहूर्त - नोव्हेंबर ३१
पाचवा मुहूर्त - फेब्रुवारी १५
तारीख पे तारीखच...
गोखले पूल धोकादायक ठरल्यामुळे नोव्हेंबर २०२२ मध्ये बंद करण्यात आला. त्यानंतर पावसाळ्यापूर्वी एक बाजू सुरू करण्याचे लक्ष्य ठरवण्यात आले होते. मात्र, अत्यंत गुंतागुंतीच्या या कामात अनेक अडचणी आल्याने ते वेळेत पूर्ण झाले नाही. त्यानंतर अनेक तांत्रिक बाबींमुळे पुलाची मार्गिका सुरू करण्याची तारीख पुढे ढकलण्यात आली.
महत्त्वाचे म्हणजे या सर्व प्रक्रियेदरम्यान पूल विभागातील मुख्य अभियंते आणि इतर अधिकारी, पायाभूत सुविधांचे उपायुक्त या सगळ्यांचा सहभाग होता तरी तांत्रिक अडचणींमुळे अद्याप पूल वेळेत सुरू होऊ शकलेला नाही.
पुलाची सद्य:स्थिती काय आहे?
रेल्वे भागात ७.८ मीटर उंचीवरून गर्डर खाली उतरविणे हे जिकीरीचे काम होते. पश्चिम रेल्वे प्रशासन व तांत्रिक सल्लागार यांच्याकडून सर्व चाचण्या, परिक्षण यशस्वी पार पडल्यानंतरच पूल खाली उतरविण्याचे काम ३ जानेवारी २०२४ पासून सुरू करण्यात आले. लोखंडी तुळई (गर्डर) रेल्वे भागावर सरकविणे व निर्धारित जागेवर आणण्यासाठी ७.८ मीटरने उतरविणे ही कामे सर्व यंत्रणांनी खूप काळजीपूर्वक, सावधानतेने व रेल्वे मालमत्ता, रेल्वे प्रवासी यांची काळजी घेऊन केलेली आहेत. त्यामुळे तुळई निर्धारित कालावधीत स्थानापन्न करण्यासाठी अतिरिक्त कालावधी लागला आहे.