मुंबई :
गोखले पुलाच्या उंचीतील तफावत दूर करण्यासाठी बर्फीवाला पूल तोडण्याची गरज नाही, असा अहवाल व्हीजेटीआय संस्थेच्या तज्ज्ञांनी मुंबई महापालिकेला सादर केला आहे. बर्फीवाला उड्डाणपूल पाडण्याऐवजी विशेष तंत्राचा वापर करून पुलाचा स्लॅब उंचावता येऊ शकतो, अशी शिफारस अहवालात करण्यात आली आहे.
धोकादायक झालेला गोखले पूल नव्याने बांधला जात असून पुलाची एक मार्गिका वाहतुकीसाठी सुरू करण्यात आली आहे. मात्र, या मार्गिकेच्या बांधणीत तांत्रिक त्रुटी निर्माण झाली आहे. हा पूल बर्फीवाला पुलाला जोडणे अपेक्षित होते. त्यामुळे एस.व्ही. रोडवरील वाहतूककोंडी टाळून पश्चिम द्रुतगती महामार्गावर प्रवेश करणे सुलभ होणार होते. मात्र, गोखले पुलाची मार्गिका सुरू झाल्यानंतर पुलाची उंची काही मीटरने वाढल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या पुलावरून बर्फीवाला पुलावर जाणे अशक्य बनले आहे. मार्गिका सुरू होऊनही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. पुलाची उंची वाढल्याने निर्माण झालेला घोळ निस्तरण्यासाठी पालिकेने व्हीजेटीआयला साकडे घातले होते.
कसे होणार काम?- त्यावर उपाय सुचवणारा अहवाल व्हीजेटीआयने पालिकेला सादर केला आहे. त्यात उंचीतील तफावत दूर करण्यासाठी बर्फीवाला पूल तोडण्याची गरज नाही. त्यापेक्षा बर्फीवाला पुलाचा स्लॅब उंच करून उंचीतील तफावत दूर करता येईल. - पुलाचे स्तंभ खालून वर करण्यासाठी अभियांत्रिकी तंत्राचा वापर करणे शक्य आहे. त्यानंतर रस्त्याचे डांबरीकरण करता येईल, असा उपाय अहवालात सुचवण्यात आला आहे. जॅकचा वापर करून स्लॅब उंच करता येऊ शकतो. हे काम तीन महिन्यांत पूर्ण होऊ शकते, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. - मात्र त्यासाठी अत्यंत प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करावा लागणार आहे. स्लॅब उचलण्याच्या अनुभव असलेल्या पाच एजन्सीची या कामासाठी शिफारस करण्यात आली आहे.