Join us  

गोखले पूल रेल्वे पाडणार! महापालिका, वाहतूक विभाग आणि रेल्वे यांच्या संयुक्त बैठकीत निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2022 5:38 AM

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या अंधेरी येथील गोखले पुलाचे पाडकाम कोण करणार, यावरील खल संपला

मुंबई :

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या अंधेरी येथील गोखले पुलाचे पाडकाम कोण करणार, यावरील खल संपला असून, पश्चिम रेल्वेकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शुक्रवारी महापालिका, वाहतूक विभाग आणि पश्चिम रेल्वे यांच्यात झालेल्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अंधेरी पूर्व आणि पश्चिम या दोन परिसरांना जोडणारा हा महत्त्वाचा पूल असून, तो बंद झाल्यापासून प्रवाशांचे हाल झाले आहेत, शिवाय वाहतुकीचेही तीनतेरा वाजले आहेत. 

प्रथम स्ट्रक्चरल अहवालावर मत घेण्याचे आणि पादचारी, रिक्षा आणि दुचाकी वाहनांसाठी स्ट्रक्चरल क्लीअरन्ससाठी एक लेन वापरली जाऊ शकते का, याचे मूल्यांकन करण्याचा निर्णय शुक्रवारच्या बैठकीत घेण्यात आला. तज्ज्ञांचे मत आजमावण्याचे काम आठ दिवसांत पूर्ण केले जाईल. पश्चिम रेल्वे सध्याच्या पुलाचा एक भाग पाडण्यासाठी निविदा काढेल आणि फेब्रुवारीच्या अखेरीस पुलाचा एक भाग पाडण्याचे काम पूर्ण केले जाईल. पूल पाडला जात असल्याने, नवीन पुलाच्या पुनर्बांधणीसाठी आणि प्री-कास्ट मटेरिअल तयार करण्यासाठी महापालिका निविदा काढणार आहे. मार्चमध्ये महापालिका साइटवर प्री-कास्ट मटेरियल एकत्र करण्याचे काम सुरू करेल. मेअखेरपर्यंत काम पूर्ण करेल. जूनमध्ये पुलावर सिंगल लेन सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे.

उपमुख्यमंत्र्यांची रेल्वेमंत्र्यांना विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी बोलून गोखले पुलाचे काम जलद गतीने करण्याची विनंती केली.  त्याचा पाठपुरावा करण्यासाठी पालिका, रेल्वे आणि वाहतूक विभागाची उच्चस्तरीय बैठक उपनगराचे पालकमंत्री  मंगलप्रभात लोढा यांनी बोलावली होती.  या बैठकीत वरील उपाययोजनांच्या अंमलबजावणीबाबत चर्चा आणि निर्णय झाले, अशी माहिती अंधेरी पश्चिम विधानसभा क्षेत्राचे भाजप आमदार अमित साटम यांनी दिली.गोखले पुलाचा एक भाग १५ मार्च २०२३ रोजी पाडण्यात येणार आहे. उत्तर मार्गिका बांधून नागरिकांसाठी खुली झाल्यानंतर दक्षिण मार्गिका तोडण्यात येईल. हा उड्डाणपूल बांधण्यासाठी १२ नोव्हेंबर रोजी पालिका निविदा काढणार आहे अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या सूत्रांनी दिली.

टॅग्स :मुंबई