Join us

गोखले पूल ऑक्टोबरमध्ये खुला होणार : मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2023 1:25 PM

गोखले उड्डाणपुलाचे पाडकाम पश्चिम रेल्वे, तर पुलाची पुनर्बांधणी मुंबई महापालिका करत आहे.

मुंबई : अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले उड्डाणपूल ऑक्टोबरपर्यंत खुला केला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. त्या संदर्भातील निर्देश महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले, तसेच हा पूल सुरू होईपर्यंत बाजूचा रेल्वे पूल पादचाऱ्यांना वापरण्यासाठी परवानगी द्यावी, यासाठी स्वतः पश्चिम रेल्वेच्या महाप्रबंधकांशीही चर्चा केल्याची माहिती त्यांनी दिली. गोखले उड्डाणपुलाचे पाडकाम पश्चिम रेल्वे, तर पुलाची पुनर्बांधणी मुंबई महापालिका करत आहे. पूल पुनर्बांधणीचे काम मेपर्यंत पूर्ण करून, किमान एक मार्गिका सुरू करण्याचा प्रयत्न होता. या पुलाच्या आरेखनाला पश्चिम रेल्वेने २ फेब्रुवारीला मंजुरी दिली. या स्टील उपकरणांसाठी दोन उत्पादक आहेत. यातील एका उत्पादकाच्या प्लाण्टमध्ये अचानक अनिश्चित काळासाठी संप झाल्याने, पुलासाठी लागणारे गर्डर आणि अन्य साहित्य पुरवठ्यावर परिणाम झाला. सबब पुनर्बांधणी प्रक्रिया रखडली. पुलासाठी आवश्यक असलेले स्टील व इतर साहित्य या संदर्भात आपण जिंदालसारख्या कंपनीशी चर्चा केली असून, पालिकेला आवश्यक साहित्य वेळेत मिळेल, याची काळजी घेतली आहे. त्यामुळे ऑक्टोबरपर्यंत गोखले पूल खुला होईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. 

पावसाळ्यातही काम सुरू राहणार -जून महिन्यात पावसाचे आगमन होणार आहे, त्यामुळे पूल वाहतुकीसाठी बंद असल्याने, अंधेरी पूर्व व पश्चिम, तसेच बोरीवलीच्या दिशेने व अंधेरीहून दक्षिण मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीचा खेळखंडोबा होणार आहे. या दरम्यान पुलाचे काम करणे किती आणि कसे शक्य होईल, याबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर पावसाळ्यातही पुलाचे काम सुरू राहील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :एकनाथ शिंदेमुंबई