गोखले उड्डाणपूल होणार इतिहासजमा; पाडकामासाठी आजपासून २० तासांचा मेगाब्लॉक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 07:50 AM2023-01-10T07:50:40+5:302023-01-10T07:50:53+5:30
पश्चिम रेल्वे करणार पाच दिवस रात्रकालीन काम
मुंबई : पश्चिम रेल्वेच्या अंधेरी रेल्वे स्थानकादरम्यान असलेला गोखले उड्डाणपूल बंद केल्यानंतर आता रेल्वेने या पुलाच्या पाडकामासाठी सलग पाच दिवस चार-चार तासांचा रात्रकालीन मेगाब्लॉक अप-डाऊन मार्गावर घेतला आहे. हा मेगाब्लॉक दि. १०, ११, १२, १३ आणि १४ जानेवारी रोजी मध्यरात्री १२:४५ ते पहाटे ४:४५ वाजेपर्यंत घेतला जाणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे.
गोखले पूल १९७५मध्ये बांधण्यात आला होता. २०१९मध्ये सीएसएमटी येथील हिमालय पुलाच्या दुर्घटनेनंतर मुंबईतील सर्वच पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. यात सल्लागाराने गोखले पुलाच्या दुरुस्तीचा सल्ला दिला होता. त्यानुसार पालिकेने आपल्या हद्दीतील पुलाचे काम सुरू केले; मात्र, रेल्वे हद्दीतील गोखले उड्डाणपूल धोकादायक असल्याने रेल्वे हद्दीतील उड्डाणपूल पाडून नव्याने बांधण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यानुसार, ७ नोव्हेंबर २०२२पासून हा उड्डाणपूल बंद करण्यात आला आहे.
आता हा उड्डाणपूल पश्चिम रेल्वेकडून पाडण्यात येणार आहे. रेल्वे रुळावरील पुलाचा भाग हटविण्यासाठी आता पश्चिम रेल्वेने तब्बल २० तासांचा मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा ब्लॉक पाच टप्प्यांत घेण्यात येणार आहे. उड्डाणपूल पाडकामासाठी सलग पाच दिवस चार-चार तासांचे रात्रकालीन मेगाब्लॉक घेतले जाणार आहेत. हा ब्लॉक दि. १०, ११, १२, १३ आणि १४ जानेवारी रोजी मध्यरात्री १२:१५ ते पहाटे ४:४५ वाजेपर्यंत घेतला जाणार आहे.
या लोकल धावणार जलद मार्गांवरून
चर्चगेट ते भाईंदर रात्री ११:२७, ११:३८,१२:०९,१२:१६.१२:२८,१२:४३, चर्चगेट ते नालासोपारा रात्री ११:४६, चर्चगेट ते बोरिवली रात्री ११:५२ वाजता, चर्चगेट ते विरार रात्री ११:५८,१२:५०, चर्चगेट ते अंधेरी १२:.३१ वाजता.
पश्चिम रेल्वेच्या डाऊन धिम्या मार्गावर मध्यरात्री १२:१५ ते पहाटे ४:४५ वाजेपर्यंत असणार आहे. तसेच अप-डाऊन हार्बर मार्गावर रात्री १२:४५ ते पहाटे ४:४५ वाजेपर्यंत असणार आहे. सांताक्रूझ ते गोरेगाव स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येणार आहे. विलेपार्ले येथे दुहेरी थांबा मिळेल आणि प्लॅटफॉर्मच्या अभावी राम मंदिरात थांबणार नाही.