गोरेगाव पूर्व दिंडोशी येथील गोकुळधाम प्रसूतिगृह आठ वर्षे कुलूपबंद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:06 AM2020-12-24T04:06:59+5:302020-12-24T04:06:59+5:30

मुंबई : गोरेगाव (पूर्व) दिंडोशी येथील गोकुळधाम प्रसूतिगृह गेल्या आठ वर्षांचा कालावधी लोटूनही अजून सुरू झालेले नाही. या पार्श्‍वभूमीवर ...

Gokuldham Maternity Hospital at Goregaon East Dindoshi locked for eight years! | गोरेगाव पूर्व दिंडोशी येथील गोकुळधाम प्रसूतिगृह आठ वर्षे कुलूपबंद !

गोरेगाव पूर्व दिंडोशी येथील गोकुळधाम प्रसूतिगृह आठ वर्षे कुलूपबंद !

Next

मुंबई : गोरेगाव (पूर्व) दिंडोशी येथील गोकुळधाम प्रसूतिगृह गेल्या आठ वर्षांचा कालावधी लोटूनही अजून सुरू झालेले नाही. या पार्श्‍वभूमीवर महिला बालकल्याण समितीत भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग क्रमांक-५२ च्या नगरसेविका प्रीती सातम यांनी हरकतीचा मुद्दा मांडून पुढील तीन महिन्यांत प्रसूतिगृह सुरू करण्याची मागणी केली. जोपर्यंत प्रसूतिगृहाचे काम सुरू होणार नाही, तोपर्यंत हरकतीचा मुद्दा राखून ठेवून सदर कामाबाबतची सद्य:स्थिती सादर करण्याची मागणी भाजप नगरसेवकांनी महिला व बालकल्याण समितीच्या बैठकीत केली. पालिका सत्ताधारी महिलांच्या आरोग्याबाबत उदासीन असल्याचा आरोप त्यांनी केला.

गोरेगाव परिसरात प्रसूतिगृहासाठी आरक्षण असलेल्या भूखंडावर उभारलेली चार मजली इमारत विकासकाकडून सन २०१३ मध्ये महापालिकेच्या ताब्यात देण्यात आली. पालिकेने ही इमारत एका खासगी वैद्यकीय संस्थेला प्रसूतिगृह चालविण्यासाठी दिली. या संस्थेचे तिथूनच काही अंतरावर रुग्णालय आहे. मात्र, या खाजगी रुग्णालयाकडून या इमारतीचा वापर वैयक्तिकरीत्या केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

२०१८ मध्ये महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने खासगी सहभाग तत्त्वावर याठिकाणी प्रसूतिगृह सुरू करून एनआयसीयू सुरू करण्याच्या अटीवर ही वास्तू खाजगी संस्थेला दिली. मात्र, याबाबतचे करारपत्र होऊन ही जागा संस्थेच्या ताब्यात गेल्यानंतरही मागील दोन वर्षांमध्ये या संस्थेने कोणत्याही प्रकारची सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली नाही. उलट, या जागेचा वापर खाजगी कामाकरिता होत असल्याचे निदर्शनास आले, अशी माहिती त्यांनी दिली.

त्यामुळे महापालिका आयुक्तांनी या प्रकरणी तातडीने लक्ष घालून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तसेच या खासगी वैद्यकीय संस्थेला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करून ही वास्तू पुन्हा आपल्या ताब्यात घेऊन त्या ठिकाणी महापालिकेच्या वतीने सुविधा उपलब्ध करावी, अशी मागणी नगरसेविका सातम यांनी केली आहे.

याला नगरसेविका सुरेखा पाटील, रिटा मकवाना, जागृती पाटील, सुनीता यादव, अंजली खेडकर, लीना पटेल-देहरेकर, शीतल गंभीर यांनी पाठिंबा दिला.

------------------------

Web Title: Gokuldham Maternity Hospital at Goregaon East Dindoshi locked for eight years!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.