मनोहर कुंभेजकर / मुंबईगोरेगाव पूर्वेकडील गोकूळधाम मेडिकल सेंटरने रुग्णांकडून पाचशे आणि हजाराच्या नोटा घेण्यास नकार दिला असतानाच येथील डेबिटकार्ड स्वाईप मशीनही बंद असल्याने रविवारी सकाळी सेंटरमध्ये विविध वैद्यकीय चाचण्यांसाठी दाखल झालेल्या रुग्णांना मनस्ताप झाला. यावर महिलांनी आवाज उठवताच व्यवस्थापनाने वैद्यकीय चाचणीची रक्कम शिल्लक ठेवत वैद्यकीय चाचण्या घेण्यास परवानगी दिली.वैद्यकीय खासगी, सरकारी सेवा, डॉक्टर्स आणि मेडिकल स्टोअर्सने पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा स्वीकाराव्यात, असे सरकारी आदेश असून, याचे पालन करणार नाहीत अशांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. मात्र असे असतानाही गोकूळधाम मेडिकल सेंटरने ८ नोव्हेंबरच्या रात्रीपासूनच वैद्यकीय सेवांसाठी पाचशे आणि हजाराची नोट घेतली जाणार नाही, असा फलक लावला. रविवारी सकाळीही वैद्यकीय सेवांसाठी पाचशे आणि हजारच्या नोटा घेण्याबाबत प्रशासनाने टाळाटाळ केली. शिवाय डेबिटकार्ड स्वाईप मशीनही बंद पडल्याने अखेर सुटे पैसे घेऊनच वैद्यकीय चाचण्या केल्या जातील, असे स्पष्टीकरण व्यवस्थापक रितेश वादवा यांनी दिले.वैद्यकीय सेवांसाठी येथे दाखल झालेल्या स्मिता धर्म आणि चड्डा यांनी वादवा यांना जाब विचारला. शिवाय तत्काळ सेवांसाठी इतर ठिकाणी पाचशे आणि हजारच्या नोटा स्वीकारण्यात येत असताना येथे का घेतल्या जात नाहीत, असा सवाल करत प्रशासनाला धारेवर धरले. नागरिकांचा रौद्रावतार पाहून अखेर प्रशासनाने नमते घेत रुग्णांचे पैसे शिल्ल्क ठेवत वैद्यकीय चाचण्या करण्याचे आदेश दिले.
गोकूळधाम मेडिकल सेंटरची मनमानी
By admin | Published: November 15, 2016 5:05 AM