भाजप नेत्याच्या घरातून सोन्याच्या मुंग्या चोरीला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 06:03 AM2019-04-25T06:03:47+5:302019-04-25T06:05:50+5:30

माटुंगा येथील घटना; पोलीस तपास सुरू

The gold ants were stolen from the BJP leader's house | भाजप नेत्याच्या घरातून सोन्याच्या मुंग्या चोरीला

भाजप नेत्याच्या घरातून सोन्याच्या मुंग्या चोरीला

Next

मुंबई : भाजपचे महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रसाद लाड यांच्या घरात सजावटीसाठी ठेवलेल्या सोन्याचा मुलामा असलेल्या पितळी मुंग्यांवरच चोरांनी हात साफ केल्याचा प्रकार माटुंगा येथे घडला. या प्रकरणी माटुंगा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात एकूण ७६ हजार किमतीच्या १९ मुंग्या चोरीस गेल्या आहेत.

माटुंगा येथील भाऊ दाजी रोड परिसरात लाड यांचे निवासस्थान आहे. त्यांच्याकडे विशाल गजानन जावळे (३६) हे सुरक्षारक्षक म्हणून नोकरीला आहेत. त्यांच्याच तक्रारीवरून पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, सोमवारी सकाळी ८.३० च्या सुमारास गार्डन सिटिंग परिसराची पाहणी करीत होतो.

तेथील एका लाकडी ओंडक्यावर दीड ते दोन इंचाच्या पितळी सोनेरी मुलामा दिलेल्या १९ सजावटीच्या मुंग्या होत्या. मात्र, त्या ओंडक्यावर दिसून आल्या नाहीत. त्यानंतर त्यांनी सकाळी हाउस किपिंग करणारा ब्लेज डिसुजा (५०) यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनीही मुंग्या कशा चोरीस गेल्या, याबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचे सांगितले.

तेथील सीसीटीव्ही फूटेज तपासले असता त्यात चोरटा कैद झाल्याचे निदर्शनास आले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये मिळालेल्या माहितीनुसार पहाटे सव्वातीनच्या सुमारास इमारतीच्या पाठीमागील भिंतीवर असलेल्या कॅमेरावर अज्ञात इसमाने कपडा टाकला. त्यानंतर काही वेळाने कपडा पुन्हा काढून भिंत उतरताना तो दिसून आला. भिंत उतरून परत कॅमेऱ्यावर त्याने कपडा टाकला. त्यानंतर ३.१७ वा. सुमारास कॅमेरावरील कपडा काढून तो पसार झाला.

घडलेल्या या चोरीच्या प्रकाराबाबत याबाबत लाड कुटुंबीयांना माहिती देत जावळे यांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: The gold ants were stolen from the BJP leader's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.