वडाळ्यातून कोट्यवधींचे सोन्याचे चेंडू जप्त, चेन्नईतील इलेक्ट्रीशियन ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2024 11:32 AM2024-11-08T11:32:06+5:302024-11-08T11:32:09+5:30
Mumbai Crime News: वडाळ्यातून गुरुवारी रात्री चेन्नईच्या इलेक्ट्रिशियनकडून एक कोटी ११ लाख किमतीची सोन्याची पावडर असलेले चेंडू जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
मुंबई - वडाळ्यातून गुरुवारी रात्री चेन्नईच्या इलेक्ट्रिशियनकडून एक कोटी ११ लाख किमतीची सोन्याची पावडर असलेले चेंडू जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. अब्दुलकर अब्दुल मजीद (वय ४३) असे इलेक्ट्रिशियनचे नाव असून डोंगरीतील शकील नावाच्या व्यक्तीकडून हे चेंडू घेऊन अंधेरीतील व्यक्तीकडे देण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. वडाळा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजीव शेजवळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथक अधिक तपास करत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री दहाच्या सुमारास तपासणीदरम्यान वडाळा पूर्वेकडील पूर्व द्रुतगती मार्गावर चेन्नईला राहणाऱ्या अब्दुल मजीद याच्या संशयास्पद हालचाली पथकाने हेरल्या. त्याच्या झडतीत पोलिसांना १ कोटी ११ लाख किमतीचे १४५७.२४ ग्रॅम सोन्याची पावडर मिळून आली. याबाबत चौकशी करताच त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्याकडे कुठलीही बिले सापडली नाहीत. प्लास्टिक टेपने गुंडाळलेल्या बॉलमधून सोन्याची तस्करी झाली.
डोंगरीतील हॉटेलमध्ये केलेला मुक्काम
- तपासात हे सोने शकील नावाच्या व्यक्तीचे असल्याचे सांगितले. तो चेन्नई येथून शनिवारी डोंगरी येथील दर्गा येथे आला होता. येथीलच एका हॉटेलमध्ये थांबला. त्याला चेन्नई येथील चुलत भावाने हे सोन्याची पावडर असलेले चेंडू शकीलकडून घेऊन अंधेरीत एका व्यक्तीकडे सोपविण्याची जबाबदारी दिल्याचे सांगितले.
- शकीलने कुठलेही बिल दिले नसल्याचेही त्याने नमूद केले. याबाबत निवडणूक कर्मचाऱ्यांना माहिती देण्यात आली. पथकाने डोंगरी येथे धाव घेतली. मात्र, शकील मोबाईल बंद करून पसार झाल्याचे समोर आले. याप्रकरणी घटनेची नोंद करण्यात आली आहे. शकीलसह अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे. निवडणूक पथकासह गुन्हे शाखाही याबाबत तपास करत आहे.