Join us

सोने खरेदीत ३0 टक्क्यांनी घट

By admin | Published: October 23, 2015 3:24 AM

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या मुहूर्तावर यंदा सोने खरेदीत मुंबईकरांनी निरुत्साह दाखवला आहे. मुंबई ज्वेलर्स असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार गेल्या

- चेतन ननावरे,  मुंबईसाडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या मुहूर्तावर यंदा सोने खरेदीत मुंबईकरांनी निरुत्साह दाखवला आहे. मुंबई ज्वेलर्स असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत या वेळी सराफा बाजाराच्या कमाईत ३० टक्क्यांची घट झाली आहे. त्यामुळे किमान दिवाळीत तरी सराफा बाजाराचे ‘अच्छे दिन’ येतील, अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली.सलग प्रतितोळा २६ हजारांवर असलेले सोने दसऱ्याला २३ ते २४ हजारांपर्यंत उतरेल, अशी अपेक्षा मनात ठेवलेल्या ग्राहकांची निराशा झाल्याने ही घट झाल्याची शक्यता संघटनेचे प्रवक्ते कुमार जैन यांनी व्यक्त केली. जैन म्हणाले की, गेल्या वर्षी दसऱ्याच्या दिवशीच म्हणजेच ४ आॅक्टोबर २०१४ रोजी सोन्याचा भाव प्रति तोळा २६ हजार ५०० रुपये इतका होता. यंदा सलग काही दिवस सोने प्रति तोळा २६ हजारांवर होते. मात्र काहीच दिवसांपूर्वी २७ हजारांचा टप्पा ओलांडलेल्या सोन्याने दसऱ्याच्या दिवशीही २७ हजार ४०० रुपये भाव कायम ठेवला. परिणामी गेल्या वर्षी ३५० कोटी रुपयांचा गल्ला करणाऱ्या सराफा बाजाराला यंदा २२५ कोटी रुपयांवर समाधान मानावे लागले आहे. गेल्या दहा वर्षांतील खराब दसरा म्हणून सराफा बाजार या दसऱ्याकडे पाहत असल्याचेही जैन यांनी सांगितले. त्यामुळे दिवाळीमध्ये गेल्या दहा वर्षांतील खरेदीचे रेकॉर्ड सोने तोडेल, अशी अपेक्षाही तज्ज्ञांनी व्यक्त केल्याचे जैन यांनी सांगितले. दसऱ्याच्या मुहूर्तावर किमान १ ते ५ ग्रॅम इतके सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांनीही खरेदीत निरुत्साह दाखवला. मात्र भाव २६ हजारांवर असताना दागिन्यांची आॅर्डर दिलेल्या ग्राहकांनी डिलीव्हरी घेण्यासाठी गर्दी केल्याने काही प्रमाणात बाजारात गर्दी झाल्याचेही त्यांनी सांगितले.