अक्षय्य तृतीयेला सोनेखरेदी ऑनलाइन, कोरोनामुळे सराफ बाजार बंदच

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 06:06 AM2021-05-13T06:06:06+5:302021-05-13T06:10:32+5:30

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सरकारने परवानगी दिली तर सराफा बाजार उघडला जाईल, असे सांगत मुंबई ज्वेलर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष कुमार जैन यांनी सांगितले की, गेल्यावर्षी अक्षय्य तृतीयेला सोन्याचा दर प्रतितोळा ४२ हजार होता.

Gold buying online for Akshayya Tritiya, market closed due to corona | अक्षय्य तृतीयेला सोनेखरेदी ऑनलाइन, कोरोनामुळे सराफ बाजार बंदच

अक्षय्य तृतीयेला सोनेखरेदी ऑनलाइन, कोरोनामुळे सराफ बाजार बंदच

Next

सचिन लुंगसे, विजयकुमार सैतवाल -
 
मुंबई/जळगाव : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे लागू असलेल्या निर्बंधांमुळे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेला सलग दुसऱ्या वर्षी सराफ बाजार बंद राहणार आहे. मात्र, ग्राहकांना सोने-चांदीची ऑनलाइन खरेदी करता येणार आहे. सराफांनी यासाठी तयारी पूर्ण केली असून या ऑनलाइन व्यवहारांमुळे सराफ बाजार बंद असला तरीही मुहूर्तांची २५ टक्के उलाढाल होईल, अशी आशा व्यापारी वर्गातून व्यक्त होत आहे.

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सरकारने परवानगी दिली तर सराफा बाजार उघडला जाईल, असे सांगत मुंबई ज्वेलर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष कुमार जैन यांनी सांगितले की, गेल्यावर्षी अक्षय्य तृतीयेला सोन्याचा दर प्रतितोळा ४२ हजार होता. यावेळी तो ४७ ते ४८ हजारांच्या आसपास राहील. परंतु, भविष्यात सोन्याचा दर ६० ते ७० हजारांवर जाण्याची शक्यता असल्याने मुहुर्तावर गुंतवणूकदार खरेदी करतीलच. याशिवाय १४ जुलैपर्यंत लग्नाचे मुहूर्त आहेत. त्यामुळेही सोन्याची खरेदी होईल, अशी अपेक्षा आहे.

आम्ही ग्राहकांना व्हिडिओ कॉलद्वारे सेवा देत आहोत. जर त्यांना सोने आवडले तर आम्ही त्यांना घरपोहोच सेवा देतो. त्यानंतर आम्हाला ते ऑनलाइन पेमेंट करतात, असेही जैन यांनी सांगितले. 

कमॉडिटी बाजारात झळाली
-  सुवर्ण पेढ्या बंद असल्या तरी कमॉडिटी बाजारात सोन्याची मोठी उलाढाल होत आहे. त्यात अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर अधिक झळाळी येत आहे. 
-  सध्या खरेदीचे प्रमाण ५८% असून, तर विक्री केवळ २९%च आहे. तसेच १३% थांबलेल्या व्यवहारांचे (होल्ड) प्रमाण आहे. 
-  कमॉडिटी बाजारात सोन्याचे भाव ४७ हजार ६३० रुपये प्रति तोळा असून, चांदी ७१ हजार ४६६ रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. 

-  ६० हजार कोटींचा 
लॉकडाऊनमुळे आतापर्यंत तोटा
-  २०० कोटींची उलाढाल राज्यात रोज सराफा बाजारात होते.
-  सण असतात तेव्हा ही उलाढाल ५०० ते ७०० कोटी होते.
-  झवेरी बाजारात काम करत असलेले ४ लाख कारगीर मूळ गावी गेले आहेत.

जळगावातील सुवर्ण बाजारात सलग दुसऱ्या वर्षी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदी खंडित होणार आहे. परंतु कमॉडिटी बाजारात उलाढाल सुरू आहे.    - स्वरूप लुंकड, सचिव, जळगाव शहर सराफ असो.
 

Web Title: Gold buying online for Akshayya Tritiya, market closed due to corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.