सुवर्ण चषक हॉकी : ‘पीएनबी’ संघाची उपांत्य फेरीत धडक, इंडियन आॅइलचीही आगेकूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 01:53 AM2017-12-18T01:53:44+5:302017-12-18T01:53:53+5:30
गतउपविजेत्या पंजाब नॅशनल बँक (पीएनबी, दिल्ली) आणि माजी विजेते इंडियन आॅइल या संघांनी आपआपल्या सामन्यात दणदणीत विजयाची नोंद करताना ५२व्या मुंबई सुवर्ण चषक हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. ‘पीएनबी’ने बलाढ्य पश्चिम रेल्वेचे तगडे आव्हान ५-० असे सहजपणे परतावले. त्याच वेळी इंडियन आॅइलने अपेक्षित बाजी मारताना युनियन बँक आॅफ इंडियाचा (यूबीआय) ५-१ असा धुव्वा उडवला.
मुंबई : गतउपविजेत्या पंजाब नॅशनल बँक (पीएनबी, दिल्ली) आणि माजी विजेते इंडियन आॅइल या संघांनी आपआपल्या सामन्यात दणदणीत विजयाची नोंद करताना ५२व्या मुंबई सुवर्ण चषक हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. ‘पीएनबी’ने बलाढ्य पश्चिम रेल्वेचे तगडे आव्हान ५-० असे सहजपणे परतावले. त्याच वेळी इंडियन आॅइलने अपेक्षित बाजी मारताना युनियन बँक आॅफ इंडियाचा (यूबीआय) ५-१ असा धुव्वा उडवला.
चर्चगेट येथील हॉकी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात ‘पीएनबी’ने जबरदस्त सांघिक खेळ करताना पश्चिम रेल्वेची ‘चेन’ खेचली. गगनदीप सिंग (ज्युनिअर) आणि गगनदीप सिंग (सिनिअर) यांचा धडाकेबाज खेळ ‘पीएनबी’च्या विजयात मोलाचा ठरला. गगनदीप (ज्युनिअर) याने २२व्या आणि ४५व्या मिनिटाला गोल करत संघाला आघाडीवर नेले.
गगनदीप (सिनिअर) याने बचावामध्येही चमक दाखवताना ४२व्या मिनिटाला वेगवान गोल करत पश्चिम रेल्वेवर दडपण आणले. त्याचप्रमाणे गुरजिंदर सिंग (५१) आणि सुमित टोप्पो (६०) यांनी प्रत्येकी एक गोल करत पश्चिम रेल्वेचा पराभव निश्चित केला.
तत्पूर्वी झालेल्या अन्य एका एकतर्फी सामन्यात इंडियन आॅइलने ‘यूबीआय’चा ५-१ असा धुव्वा उडवला. तलविंदर सिंग याने तिसºया आणि ४६व्या मिनिटाला गोल करत संघाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. तसेच भरत चिकारा (८), रघुनाथ वोकालिगा (२९) आणि गुरजिंदर सिंग (३४) यांनीही प्रत्येकी एक गोल करत इंडियन आॅइलच्या विजयामध्ये हातभार लावला. ‘यूबीआय’कडून केवळ सुरज शाही (६७) याने संघाचा एकमेव गोल नोंदवला.
मंगळवारी होणाºया उपांत्य सामन्यात ‘पीएनबी’चा सामना ‘बीपीसीएल’विरुद्ध होईल. दुसरीकडे इंडियन आॅइल अंतिम फेरीत प्रवेश निश्चित करण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेच्या आव्हानाला सामोरे जातील.