लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर यंदाही गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यावर सर्व मंडळांनी भर दिला आहे. यंदा मुंबईतील अनेक गणेशोत्सव मंडळांचे सुवर्ण, हिरक व अमृत महोत्सवी वर्ष आहे. तरीदेखील या मंडळांनी कोणताही गाजावाजा न करता यंदा आरोग्य व सामाजिक उपक्रमांवर भर दिला आहे. आपल्या मंडळास ५०, ७५ किंवा १०० वर्षे पूर्ण झाली असता ते वर्ष अधिक उत्साहात व धुमधडाक्यात साजरे केले जाते. यंदाही कोरोनाचे सावट कायम असल्याने गर्दी जमेल असे उपक्रम घेण्याऐवजी लसीकरण व रक्तदान शिबिरांना या सर्व मंडळांनी प्राधान्य दिले आहे.
योगिता तोंडवळकर (कार्यकारी सभासद, आनंदनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, जोगेश्वरी) - यंदा मंडळाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. आताच्या परिस्थितीत सामाजिक उपक्रम होणे गरजेचे आहे. अलर्ट सिटीझन फोरम या संस्थेच्या सहकार्याने आम्ही हे उपक्रम राबविणार आहोत. यामध्ये कोरोना योद्ध्यांचा सन्मान व त्यांना मोदकांचे वाटप, रक्तदान शिबिर, महिलांसाठी विशेष उपक्रम, लहान मुलांसाठी सीडबॉल उपक्रमाच्या माध्यमातून त्यांना झाडांचे महत्त्व समजविण्यात येणार आहे. राष्ट्रीय खेळाडूंचा सन्मान अशा प्रकारचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
सागर देवगडकर (सेक्रेटरी, लक्ष्मी कॉटेज बाळगोपाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ) - यंदाचे मंडळाचे हिरक महोत्सवी वर्ष असल्याने यंदा आम्ही आरोग्य उपक्रमांवर भर दिला आहे. यामध्ये रक्तदान व लसीकरण शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, नेत्रचिकित्सा, कोरोना विषयक जनजागृती मोहीम मंडळातर्फे राबविण्यात येणार आहे. गणेशोत्सवाच्या आधीही हे उपक्रम सुरू होते.
आशिष सावंत - (विश्वस्त, लालमैदान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, परळ) - यंदा मंडळाचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. यानिमित्त आम्ही मागील अनेक महिन्यांपासून सामाजिक उपक्रम राबवत आहोत. मंडळाच्यावतीने अनेक नागरिकांना मोफत लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच आम्ही मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ५१ हजार रुपयांचे दानदेखील केले आहे. गणेशोत्सवानंतर देखील हे उपक्रम सुरूच राहणार आहेत.