Join us  

अंधेरीतील दुकानातून सोन्याची कर्णफुले लंपास; तीन महिलांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2023 10:57 AM

तक्रारदार सुनील जैन (४८) यांचे अंधेरीच्या गुंदवली गावठाणमध्ये भावना ज्वेलर्स नावाचे दुकान आहे.

मुंबई : अंधेरी परिसरात एका सोनाराच्या दुकानात शिरलेल्या तीन अनोळखी महिलांनी सोन्याच्या कर्णफुलांचा जोड लंपास करत पळ काढला. याप्रकरणी सोनाराने अंधेरी पोलिसांत तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार सुनील जैन (४८) यांचे अंधेरीच्या गुंदवली गावठाणमध्ये भावना ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. त्यांनी त्यांच्या मदतीसाठी हस्तीमल कुमावत (२८) या मुलाला कामावर ठेवले आहे. जैन यांनी २५ मार्च रोजी दुपारी दोन वाजता दुकान बंद करत ते विश्रांतीसाठी घरी निघून गेले मात्र त्यांना बरे वाटत नसल्याने ते घरी आराम करत होते. तेव्हा हस्तीमल याने जाऊन दुकान उघडले आणि साडेसहाच्या सुमारास त्या ठिकाणी तीन महिला त्यांना उभ्या दिसल्या. ज्या जैन यांना पाहून तातडीने दुकानाच्या बाहेर निघून गेल्या. त्यांच्या वागण्यावर संशय आल्याने त्या नेमकी काय खरेदी करायला आल्या होत्या असे जैन यांनी हस्तीमलला विचारले. त्यावर त्यांना एक छोटासा दागिना हवा होता असे तो म्हणाला मात्र त्यांनी काही खरेदी केले नाही असेही त्याने सांगितले. 

त्यानंतर तो कानातले जोड तपासत असता एक ३० हजार रुपये किमतीचा कर्णफुलाचा जोड कमी असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याची माहिती त्याने जैन यांना देत अनोळखी महिलांना दागिने दाखवत असताना चोरी करण्यात आली याची शंका देखील त्याने व्यक्त केली. त्यानुसार चोरी झाल्याची खात्री पटल्यावर जैन यांनी तातडीने अंधेरी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.  याप्रकरणी पोलिसांनी अनोळखी महिलांविरोधात गुन्हा दाखल केला असून तांत्रिक तपास सुरू करण्यात आला आहे. लवकरच या महिलांना ताब्यात घेतले जाईल अशी माहिती तपास अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

टॅग्स :पोलिसगुन्हेगारी