२५ टक्के उलाढाल हाेण्याची शक्यता; गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा सोन्याच्या दरात प्रतितोळा ७ हजारांची वाढ
सचिन लुंगसे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाचे समूळ उच्चाटनासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सराफा बाजारातील सोन्याचे व्यवहार पूर्णत: ठप्प असले तरी शुक्रवारच्या अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर ग्राहकांना सोन्याची खरेदी ऑनलाइन करता येणार आहे. सराफांनी यासाठी केव्हाच तयारी पूर्ण केली आहे. या ऑनलाइन व्यवहारांमुळे अक्षय्य तृतीयेला सराफा बाजारात २५ टक्के उलाढाल होईल, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सरकारने परवानगी दिली तर सराफा बाजार उघडला जाईल, असे सांगत मुंबई ज्वेलर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष कुमार जैन म्हणाले की, गेल्यावर्षी अक्षय्य तृतीयेला सोन्याचा दर प्रतितोळा ४२ हजार होता. यावेळी ताे प्रतितोळा ४७ ते ४८ हजारांच्या आसपास राहील. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सोन्याच्या दरात प्रतितोळा ७ हजारांची वाढ झाली आहे. परिणामी गुंतवणूकदार यावेळी सोन्यात पैसे गुंतवतील, अशी अपेक्षा आहे. भविष्यात सोन्याचा दर ६० ते ७० हजारांवर जाण्याची शक्यता आहे.
मागच्या वर्षी सराफा बाजाराला अक्षय्य तृतीयेला कोरोनाचा मोठा फटका बसला होता. आता १४ जुलैपर्यंत लग्नाचे मुहूर्त आहेत. त्यामुळे शुक्रवारच्या अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याची खरेदी होईल, अशी आशा आहे. मात्र या खरेदी-विक्रीला सरकारने पाठिंबा दिला पाहिजे. अन्यथा, आमच्यासाठी अक्षय्य तृतीया गुढीपाडव्यापेक्षाही वाईट जाईल. आजघडीला देशभरातील सराफांच्या बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे ऑनलाइन खरेदी-विक्रीवर भर दिला जात आहे. आम्ही ग्राहकांना व्हिडिओ कॉलद्वारे सेवा देत आहोत. जर त्यांना सोने आवडले तर आम्ही त्यांना घरपोहोच सेवा देतो. त्यानंतर आम्हाला ते ऑनलाइन पेमेंट करतात, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे याच ऑनलाइन व्यवहारांमुळे अक्षय्य तृतीयेला सराफा बाजारात २५ टक्के उलाढाल होईल, अशी अपेक्षा वर्तवण्यात येत आहे.
* लॉकडाऊनमुळे आतापर्यंत ६० हजार कोटींचा तोटा
- सर्वसामान्यपणे महाराष्ट्रात रोज सराफा बाजारात २०० कोटींची उलाढाल होते.
- सण असतात तेव्हा ही उलाढाल ५०० ते ७०० कोटी एवढी हाेते.
- मात्र गेल्यावर्षीपासून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आतापर्यंत ६० हजार कोटींचा तोटा झाला आहे.
- आजघडीला झवेरी बाजारात काम करत असलेले ४ लाख कारगीर मूळ गावी गेले आहेत.
-------------------------------------------