Join us

सेनेच्या मेळाव्यातून विचारांचे सोने मिळालेच नाही - नारायण राणे

By admin | Published: October 12, 2016 11:03 AM

शिवसेना मेळाव्यातून विचारांचे सोने मिळालेच नाही. प्रेरणा, जोश व आवेश संपला' अशी टीका नाराणय राणेंनी केली.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १२ - ' शिवसेना मेळाव्यातून विचारांचे सोने मिळालेच नाही. प्रेरणा, जोश व आवेश संपला' अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना लक्ष्य करत नारायणास्त्र सोडले आहे. दरवर्षीप्रमाणे  शिवाजी पार्क येथे विजयादशमीनिमित्त शिवसेनेचा ५० वा दसरा मेळावा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरेंनी केलेल्या भाषणावर नारायण राणेंनी ट्विटरच्या माध्यमातून टीका केली आहे. 
दसरा मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी अनेक मुद्यावर भाष्य केले मात्र महापालिकेमधील भ्रष्टाचाराबद्दल चकार शब्द काढला नाही, असं म्हणत राणेंनी टोला लगावला आहे. सोबतच गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात निघत असलेल्या मराठा क्रांती मोर्चासंबंधी आणि मराठा आरक्षणासंबंधी ठोस भुमिकाही घेतली नसल्याचंही बोलले आहेत.
महापालिका निवडणूक जवळ येत असून काही भाजपा नेते स्वबळावर निवडणूक लढवण्याची भाषा करु लागले आहेत. यावरुन उद्धव ठाकरे यांनी मौन बाळगलं होतं, मात्र दसरा मेळाव्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांनी भाष्य करत २५ वर्ष जुना मित्र अचानक मागून वार करेल असे वाटले नव्हते अशी खंत व्यक्त केली. यावेळी बोलताना उद्धवनी ‘सोबत राहायचे असेल तर आनंदाने राहा. तुमच्या मागे आम्ही भिकेचे कटोरे घेऊन येणार नाही. तुम्हाला स्वबळाचं फुरफुरं येत असेल तर आज, आता युती तोडण्याची हिंमत दाखवा, असं आवाहनच भाजपाला केलं होतं. या मुद्यावरुनही नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य करत '  भाजपसोबत युती तोडू म्हणतात मग आधी स्वतः का नाही तोडत?' असा सवाल विचारला आहे. 
तसेच ' हा मेळावा विचारांसाठी नव्हता,'सैराट' होता' असा टोलाही नारायण राणेंनी लगावला.