मुंबई विद्यापीठाच्या सिद्धीची सुवर्णभरारी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 03:46 AM2019-02-08T03:46:54+5:302019-02-08T03:47:17+5:30
क्लासिकल संगीतात प्रशिक्षण घेत असूनही व्हिवा कॉलेजच्या सिद्धी नारकरने राष्ट्रीय युवा आंतरविद्यापीठ युवा महोत्सवात वेस्टर्न सोलो व्होकल स्पर्धेत आणि वेस्टर्न ग्रुप गायन स्पर्धेत २ सुवर्ण पदकांची कमाई केली आहे.
- सीमा महांगडे
मुंबई - क्लासिकल संगीतात प्रशिक्षण घेत असूनही व्हिवा कॉलेजच्या सिद्धी नारकरने राष्ट्रीय युवा आंतरविद्यापीठ युवा महोत्सवात वेस्टर्न सोलो व्होकल स्पर्धेत आणि वेस्टर्न ग्रुप गायन स्पर्धेत २ सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. विद्यापीठाने नाटुकलीच्या स्पर्धेत पटकावलेल्या रौप्य पदकाच्या कमाईतही सिद्धीचा सहभाग होता. नालासोपाराच्या व्हिवा कॉलेजमध्ये बीएससी आयटीच्या तिसऱ्या वर्षाला असलेल्या सिद्धीचे राष्ट्रीय पातळीवरील हे पहिलेच यश असल्याने मुंबई विद्यापीठातील तिच्या मार्गदर्शक आणि गुरूंना तिचा अभिमान असल्याचे युवा महोत्सवाच्या टीमचे समनव्यक प्रोफेसर निलेश सावे यांनी सांगितले.
देशभरातील १०६ विद्यापीठांतून मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी लोकवाद्य संगीत, नाटूकलं, पाश्चात्य गायन, पाश्चात्य वादन, शास्त्रीय नृत्य आणि कोलाज या सहा स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक प्राप्त केले तर भारतीय समुह गीत, पाश्चात्य समुह गीत आणि मुकनाट्य, या तीन स्पर्धांमध्ये रौप्य पदकांची कमाई केली आहे.
एकूण ६९ गुणांची कमाई करत अजिंक्यपद मिळवले आहे. त्यातही सिद्धी नारकरची एकापेक्षा अधिक स्पर्धांतील कामिगरी उजवी ठरली आहे. घरून सुरु वातीला सिद्धीच्या आवडीला पाठिंबा नव्हता़ या यशानंतर हळूहळू पाठिंबा मिळत असल्याचे सांगत ही माझ्यासाठी मोठी मिळकत असल्याचे सिध्दीने सांगितले.
मुंबई विद्यापीठासाठी हे विजेतेपद म्हणजे अभिमानाचीच बाब आहे. विद्यापीठातून केवळ बिक्षसे नाही, तर विद्यार्थ्यांच्या सर्व प्रकारच्या कलागुणांना वाव मिळावा़ त्यांचा विकास व्हावा याकडे लक्ष दिले जाते.
- निलेश सावे, समन्वयक , मुंबई विद्यापीठ विजेता टीम