आंतरराष्ट्रीय अन्वेषण संशोधन स्पर्धेत मुंबई विद्यापीठाला सुवर्ण पदक

By रेश्मा शिवडेकर | Published: March 12, 2024 09:13 PM2024-03-12T21:13:17+5:302024-03-12T21:13:34+5:30

आरोग्य विज्ञान आणि सामाजिक शास्त्रे गटात प्रथम, शेती गटात दुसरे पारितोषिक

Gold Medal to Mumbai University in International Exploration Research Competition | आंतरराष्ट्रीय अन्वेषण संशोधन स्पर्धेत मुंबई विद्यापीठाला सुवर्ण पदक

आंतरराष्ट्रीय अन्वेषण संशोधन स्पर्धेत मुंबई विद्यापीठाला सुवर्ण पदक

मुंबई: भारतीय विद्यापीठ संघ (एआययु) आणि मुंबईविद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई विद्यापीठात पहिल्यांदाच आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय अन्वेषण संशोधन महोत्सवात मुंबई विद्यापीठाने संशोधनाच्या क्षेत्रात दर्जेदार कामगिरी करत सर्वसाधारण सुवर्ण पदक पटकावले. तसेच आरोग्य विज्ञान आणि सामाजिक शास्त्रे या गटात विद्यापीठास प्रथम क्रमांक तर शेती गटात द्वितीय क्रमांक मिळाले आहे.

आरोग्य विज्ञान या गटात मानस महाले या विद्यार्थ्यांने सादर केलेल्या ‘मास्क्ड लँग्वेज मॉडेल आर फ्रेगमेंट बेस्ड ड्रग डिझायनर’ या प्रकल्पास प्रथम क्रमांक, सामाजिक शास्त्रे गटात गौरव पांडे, ऋतूजा जगतकर, स्नेहा कुमारी आणि गिन्नी केवलरामानी यांनी सादर केलेल्या ‘ऑँचलः अ रियुज्येबल, इको फ्रेंडली स्लीपिंग बॅग फॉर बॅटलींग न्युनॅटल हायपोथेरमिया इन रुरल एरिया’ या प्रकल्पास प्रथम क्रमांक आणि शेती गटात ओम यादव या विद्यार्थ्यांने सादर केलेल्या ‘सॅकोपीट टीएमः ए नोवेल पॉटींग मीडिया’ या प्रकल्पास द्वितीय क्रमांक मिळाले आहे. 

मुंबई विद्यापीठास पहिल्यांदाच या आंतरराष्ट्रीय संशोधन महोत्सवाच्या आयोजनाचे यजमानपद मिळाले. ११ आणि १२ मार्च २०२४ या दोन दिवसात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. देशभरातील २८ विद्यापीठे या संशोधन महोत्सवात सहभागी झाली  होती. विद्यापीठातील विद्यार्थ्यांमधील नवकल्पकता, वैज्ञानिक दृष्टिकोन ओळखून त्यांना संधीची उपलब्धता करून देणे, विद्यार्थ्यांसह शिक्षकांमधील संशोधनवृत्तीला बळ देऊन राज्य आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये अधिकाधिक सहभागिता वाढविणे अशा महत्वाकांक्षी उद्देश्यांसह विद्यार्थी संशोधन महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यापूर्वी राष्ट्रीय स्तरावर आंतरविद्यापीठीय राष्ट्रीय अन्वेषण संशोधन स्पर्धा म्हणून या संशोधन महोत्सवाचे आयोजन केले जात होते.

यावर्षी पहिल्यांदाच या संशोधन स्पर्धेची व्याप्ती वाढवून आंतरराष्ट्रीय विद्यार्थी संशोधन महोत्सव म्हणून आयोजन करण्यात आले.  या संशोधन महोत्सवात शेती, मुलभूत शास्त्रे, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान आरोग्य विज्ञान आणि अनुषंगिक विषय, सामाजिक शास्त्रे,  मानव्यविज्ञान,  वाणिज्य, विधी, आंतरविद्याशाखीय संशोधन अशा सहा वर्गवारीतून एकूण ७० प्रकल्पांचे सादरीकरण केले गेले असून सादरीकरणासाठी एकूण १६७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. 

दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेचे निकाल जाहिर करण्यात आले असून मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.  यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, भारतीय विद्यापीठ संघाचे संयुक्त सचिव (संशोधन) डॉ. अमरेंद्र पानी, सहाय्यक संचालक ( संशोधन) डॉ. उषा राय नेगी, मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे आणि विद्यार्थी विकास विभागाचे संचालक तथा अन्वेषण, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी संशोधन महोत्सवाचे निमंत्रक डॉ. सुनिल पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

सर्वसाधारण सुवर्ण पदक: मुंबई विद्यापीठ
शेतीः
प्रथम क्रमांक : एसआरएम इन्स्टीट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नोलॉजी, तामिळनाडू
द्वितीय क्रमांक : मुंबई विद्यापीठ
तृतीय क्रमांक : शारदा विद्यापीठ, उत्तर प्रदेश
….
मुलभूत शास्त्रेः
प्रथम क्रमांक :सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
द्वितीय क्रमांक: शिवाजी विद्यापीठ
तृतीय क्रमांक: जादवपूर विद्यापीठ, कोलकाता

अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानः
प्रथम क्रमांक: जादवपूर विद्यापीठ, कोलकाता
द्वितीय क्रमांक : शारदा विद्यापीठ, उत्तर प्रदेश
तृतीय क्रमांक: डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी, कोल्हापूर

आरोग्य विज्ञानः
प्रथम क्रमांक: मुंबई विद्यापीठ
द्वितीय क्रमांक: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
तृतीय क्रमांक:  एसजीटी विद्यापीठ हरयाणा

सामाजिक शास्त्रेः
प्रथम क्रमांक: मुंबई विद्यापीठ
द्वितीय क्रमांक: अन्नामलाई विद्यापीठ, तामिळनाडू
तृतीय क्रमांक: जादवपूर विद्यापीठ, कोलकाता

आंतरविद्याशाखीय
प्रथम क्रमांक: अन्नामलाई विद्यापीठ, तामिळनाडू
द्वितीय क्रमांक: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
तृतीय क्रमांक: अविनाशलिंगम इन्स्टीट्यूट फॉर होम सायन्स अँड हायर एज्युकेशन, तामिळनाडू

Web Title: Gold Medal to Mumbai University in International Exploration Research Competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.