सोने तारण कर्जात मागील वर्षभरात ७७ टक्के वाढ; बँकांनीही दिले सोन्यावर सढळ हाताने कर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2021 08:31 AM2021-09-04T08:31:30+5:302021-09-04T08:31:36+5:30
वैयक्तिक कर्जात मोठी वाढ
मुंबई : जुलै २०२१ला संपलेल्या १२ महिन्यांच्या कालावधीत भारतीय कंपन्या आणि सेवा क्षेत्राकडून घेण्यात आलेल्या कर्जाचे प्रमाण कमी राहिले. मात्र, या कालावधीत सोने तारण आणि क्रेडिट कार्ड व्यवसाय याच्या बळावर वैयक्तिक कर्जात मोठी वाढ झाली आहे. सोने तारण कर्ज तब्बल ७७ टक्क्यांनी वाढले आहे.
प्राप्त आकडेवारीनुसार, भारतातील एकूण कर्जात वैयक्तिक कर्जाचे प्रमाण २६ टक्के राहिले, तसेच त्याचा वृद्धीदर ११.२ टक्के राहिला. आदल्या १२ महिन्यांच्या काळात तो ९ टक्के होता. जुलै २०२१मध्ये वार्षिक आधारावरील सोने तारण कर्जाची थकबाकी (गोल्ड लोन आऊटस्टँडिंग) ७७.४ टक्क्यांनी अथवा २७,२२३ कोटी रुपयांनी वाढून ६२,४१२ कोटी रुपयांवर गेली. एसबीआयच्या सोने तारण कर्जात सर्वाधिक ३३८.७६ टक्के वाढ झाली. बँकेचे एकूण सोने तारण कर्ज २१,२९३ कोटी आहे.
सुत्रांनी सांगितले की, सोने तारण कर्जात वाढ होणे याचा दुसरा अर्थ असा की, कोविड-१९ व त्यामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे लोक आर्थिक संकटात सापडले आहेत. लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या तसेच लाखो लोकांच्या वेतनात कपात झाली, त्यातच अनेकांना उपचाराचा अतिरिक्त खर्च पेलावा लागला. ही पैशांची गरज लोकांनी सोने तारण कर्ज घेऊन भागविली, असे दिसून येत आहे. बँकांनीही सोन्यावर सढळ हाताने कर्ज दिल्याचे दिसते. कारण या कर्जाची वसुली फारसी कठीण नाही.
क्रेडिट कार्डावरील कर्जाची थकबाकीही या कालावधीत ९.८ टक्क्यांनी (१०,००० कोटी) वाढून १.११ लाख कोटी रुपये झाली. अचानक उद्भवलेल्या गरजा भागविण्यासाठी लोक चढ्या व्याज दराने कर्ज घेण्याची जोखीम पत्करत असल्याचे यातून स्पष्ट होते.