Join us

सोन्याच्या भावाने गाठला तीन महिन्यांचा नीचांक

By admin | Published: March 17, 2015 11:58 PM

जागतिक बाजारातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीच्या सराफ्यात सलग दुसऱ्या दिवशीही घसरणीचा कल राहिला. मंगळवारी सोन्याचा भाव १८५ रुपयांनी कोसळून २६,१६५ रुपये प्रति १० ग्रॅम झाला.

नवी दिल्ली : जागतिक बाजारातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीच्या सराफ्यात सलग दुसऱ्या दिवशीही घसरणीचा कल राहिला. मंगळवारी सोन्याचा भाव १८५ रुपयांनी कोसळून २६,१६५ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. हा गेल्या तीन महिन्यांचा नीचांक आहे. मागणी कमी झाल्याने ही घसरण झाल्याचे दिसून आले. दुसरीकडे चांदीचा भावही ४०० रुपयांच्या घसरणीसह ३५,६५० रुपये प्रतिकिलो झाला.जाणकारांनी सांगितले की, अमेरिकी फेडरल रिझर्व्हची दोन दिवसीय बैठक सुरू होण्यापूर्वी सराफ्यात ही घसरण नोंदली गेली आहे. जागतिक बाजारात घसरणीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक सराफ्यात मागणीत घट झाली.सिंगापूर येथे सोन्याचा भाव ३० सेंटने घटून १,१५४.५१ डॉलर प्रतिऔंस आणि चांदी ०.४ टक्क्यांनी कमी होऊन १५.५८ डॉलर प्रतिऔंस झाला. तयार चांदीचा भाव ४०० रुपयांनी कोसळून ३५,६५० रुपये व चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव ४४० रुपयांच्या घसरणीसह ३५,३६५ रुपये प्रतिकिलोवर बंद झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भावही १,००० रुपयांनी कमी होऊन खरेदीसाठी ५५,००० रुपये व विक्रीकरिता ५६,००० रुपये प्रतिशेकडा राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क) ४राजधानी दिल्लीत ९९.९ व ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी १८५ रुपयांनी घटून अनुक्रमे २६,१६५ आणि २६,०७५ रुपये प्रति १० ग्रॅमवर आला. तथापि, आठ गॅ्रम गिन्नीचा भाव २३,६०० रुपयांवर कायम राहिला.