नवरात्रोत्सवाला सोन्याचे तोरण; सोन्याची उलाढाल २०० टनांपर्यंत जाण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2023 11:17 AM2023-10-04T11:17:28+5:302023-10-04T11:17:37+5:30
नवरात्रीदरम्यान गुजरातसह राजस्थानातही मुंबईतल्या सोन्याची मागणी अधिक असेल आणि दिवसाला तिकडे जाणाऱ्या सोन्याची उलाढाल २०० टनाच्या आसपास असेल, असा दावा सराफ बाजाराने केला आहे.
मुंबई : सोन्याच्या बाजारपेठांत नोंदविण्यात येणाऱ्या चढ उतारामुळे आता प्रतितोळा ५९ हजार रुपये असणारे सोने नवरात्रौत्सवात ५५ हजार रुपये होण्याची शक्यता सराफ बाजाराने वर्तविली आहे. त्यामुळे यंदाच्या नवरात्रौत्सवात सोने-चांदीची खरेदी-विक्री जोमाने होईल, असा विश्वास सराफा व्यावसायिकांनी केला आहे. नवरात्रीदरम्यान गुजरातसह राजस्थानातही मुंबईतल्या सोन्याची मागणी अधिक असेल आणि दिवसाला तिकडे जाणाऱ्या सोन्याची उलाढाल २०० टनाच्या आसपास असेल, असा दावा सराफ बाजाराने केला आहे.
गणेशोत्सवानंतर आता मुंबापुरीला नवरात्रीचे वेध लागले आहे. मूर्ती कार्यशाळेत देवीच्या मूर्ती आकार घेत असून, बहुतांश मूर्तीवर अखेरचा रंग चढविला जात आहे. सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांच्या देवीच्या मूर्ती जवळपास तयार झाल्या असून, ८ ऑक्टोबरच्या रविवारी देवीच्या मूर्ती कार्यशाळेतून रवाना होत मंडपात दाखल होणार आहे. तत्पूर्वी मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या पायाला आता भिंगरी बांधली असून, देवीच्या आगमनाच्या तयारीसाठी महिला आणि पुरुष कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. दरम्यान, मंडळांच्या स्वागत प्रवेशद्वारांवर कोणत्या राजकीय पक्षाचा गेट लागणार, इच्छूक उमेदवार कोणकोणत्या नाक्यांवर आपले पोस्टर्स झळविणार ? याचे जोरदार नियोजन सुरु झाले आहे.
नवरात्रीदरम्यान गुजरातसह राजस्थानातही मुंबईतल्या सोन्याची मागणी अधिक असेल. आता सोने प्रतितोळा
दिवसाला तिकडे जाणाऱ्या सोन्याची उलाढाल २०० टनाच्या आसपास असेल, सोन्याचा भाव कमी हाेऊन ५५,००० इतका हाेण्याची शक्यता सराफा बाजारातील व्यापारी व्यक्त करतात.
कशाची खरेदी होणार ?
देवीची आभूषणे खरेदी करण्यावर भर दिला जाईल. यात मुकुट, कानपत्र, सोनसाखळीचा समावेश असेल. शिवाय सोन्याच्या नाण्यांची खरेदी केली जाईल.
तरुणाई काय घेणार ?
नवरात्रीला गरबा खेळणाऱ्या तरुणाईकडून सोनसाखळी, अंगठी, कर्णफुलांची खरेदी मोठ्या प्रमाणावर होईल.
भाव का खाली येईल ?
सोन्याचा भाव आता ५९ हजार तोळा आहे. नवरात्रीत हा भाव ५५ हजार होईल. डाऊन फॉलमुळे सोन्याचा भाव खाली येण्याची शक्यता आहे. भाव उतरत असल्याने खरेदी विक्री वाढत आहे. देवीला सोन्याचांदी व्यतीरिक्तचे बेन्टेक्सचे दागिने घालण्यावर भर असला तरी हे दागिने रोज बदलण्यावरही मंडळाचा भर आहे.