Join us

हॉँगकॉँगमधून मुंबईत सोन्याची तस्करी

By admin | Published: March 18, 2017 2:49 AM

दुबईपाठोपाठ हाँगकाँगमधून मुंबईत सोने तस्करी होत असल्याचे हवाई गुप्तचर यंत्रणेने केलेल्या कारवाईतून समोर येत आहे. सहा चिनी नागरिकांवर केलेल्या

मुंबई : दुबईपाठोपाठ हाँगकाँगमधून मुंबईत सोने तस्करी होत असल्याचे हवाई गुप्तचर यंत्रणेने केलेल्या कारवाईतून समोर येत आहे. सहा चिनी नागरिकांवर केलेल्या कारवाईपाठोपाठ गुरुवारी रात्री मुंबई विमानतळावरून आणखी दोन चिनी नागरिकांना सोने तस्करी प्रकरणी अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल ३७ लाख किमतीचे सोने हस्तगत करण्यात आले आहे. आरोपींमध्ये चीनच्या डायमंड कंपनीच्या व्यवस्थापकाचाही समावेश आहे. हाँगकाँगवरून मुंबईत सोन्याची तस्करी करणाऱ्या सहा चिनी प्रवाशांना कस्टम आणि हवाई गुप्तचर यंत्रणांनी १५ मार्च रोजी मुंबई विमानतळावरून बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून तब्बल पावणे दोन कोटींचे सोने जप्त केले आहे. झॅन कुन, लिह्यू झोउ, झॅग लिमिंग, याँग विंन, याँग बिनवी, ली जेर्इंशू अशी अटक प्रवशांची नावे असून, हे सहाही जण चीनचे रहिवासी आहेत. ही कारवाई सुरू असताना त्यांच्या चौकशीत एक डायमंड कंपनीचा व्यवस्थापक सोन्यासह मुंबईत येणार असल्याची माहिती हवाई गुप्तचर यंत्रणांना मिळाली. त्यानुसार गुरुवारी रात्री कस्टम आणि हवाई गुप्तचर यंत्रणा या ठिकाणी लक्ष ठेवून होत्या. याचदरम्यान जेट एअरवेजच्या विमानाने उतरलेल्या झोयू व्हीवू यांच्यासह चेन यान या महिला प्रवाशाला तपास यंत्रणेने ताब्यात घेतले. दोघेही हाँगकाँगवरून मुंबईत आले होते. त्यांच्या झडतीत ३७ लाख किमतीचे १ किलो २५५ गॅ्रमचे सोने जप्त केले. त्यात सोन्याच्या पेंडंट्सचा समावेश होता. दोघेही चीनचे रहिवासी असून, तेथील मेसर्स शेनझेन ओबीआ डायमंड कंपनीत काम करतात. झोयू हा या कंपनीचा व्यवस्थापक आहे तर चेन ही भाषांतर करण्याचे काम करते. दोघांनाही सोने तस्करीप्रकरणी अटक करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)१७ लाखांचे सोने जप्तचिनी प्रवाशांवर केलेल्या कारवाईदरम्यान जेट एअरवेजने आलेल्या नागपूरच्या एका जोडप्यालाही तपास यंत्रणेने ताब्यात घेतले. संजय कुकरेजा आणि सविता कुकरेजा अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून १७ लाख ५५ हजार किमतीचे ५८५ ग्रॅम सोने हस्तगत करण्यात आले.