दुबईतून भारतात सोन्याची तस्करी करणारे जेरबंद, १६ किलो सोने, अडीच कोटींची रोकड जप्त'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2024 02:42 PM2024-03-09T14:42:03+5:302024-03-09T14:42:32+5:30
डीआरआयने दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद रफीक रझवी (५८), महेंद्र जैन (५२) व समीर मर्चंट ऊर्फ अफजल हारून बटाटावाला (५६), उमेद सिंह (२४) व महिपाल व्यास (४२) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
मुंबई : दुबईतून सोन्याची तस्करी करून भारतात विकणाऱ्या टोळीतील सहा जणांना अटक करण्यात महसूल गुप्तवार्ता संचालनालयाला (डीआरआय) यश आले आहे. या प्रकरणी डीआरआयने छापे मारून १६ किलो सोने आणि दोन कोटी ६५ लाखांची रोकड जप्त केली आहे.
डीआरआयने दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद रफीक रझवी (५८), महेंद्र जैन (५२) व समीर मर्चंट ऊर्फ अफजल हारून बटाटावाला (५६), उमेद सिंह (२४) व महिपाल व्यास (४२) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. समीर मर्चंट सोन्याच्या तस्करीत सक्रिय असल्याची माहिती डीआरआयला मिळाली. बटाटावालाच्या माध्यमातून तस्करी व्हायची. भारतीय बाजारात वितरण करण्यासाठी ते सोने रझवीला दिले जायचे. ही विक्री माझगाव येथील दलाल महेंद्र जैनच्या मार्फत केली जायची. त्याबाबत डीआरआयचे अधिकारी तपास करीत होते. त्यांना झवेरी बाजार येथील दोन ठिकाणांवरून हा व्यवहार चालतो, असे समजले.
डीआरआयने विठ्ठलवाडी रोडवरील दुकानात छापा मारला. त्यात परदेशातून आणलेले १० किलो सोने (सहा कोटी ८६ लाख ७८ हजार रुपये), ४०९ ग्रॅम भारतीय हॉलमार्क असलेले सोने (२७ लाख रुपये) व एक कोटी ८० लाखांची रोख रक्कम जप्त केली. जैन याची चौकशी केल्यानंतर त्याने इतर आरोपींसाठी सोने विकत असल्याचे सांगितले. त्यानुसार डीआरआयने रझवी याच्या इमामवाडा व मर्चंटच्या वर्सोवा येथील राहत्या घरी छापे मारले. रझवीच्या घरात तीन किलो ७७२ ग्रॅम सोने सापडले. ६० लाख ४० हजार रोख व ४,६०० पाऊंडही जप्त केले.
मास्टरमाइंडची पत्नी सक्रिय सदस्य
मास्टरमाइंडची पत्नीदेखील सिंडिकेटची सक्रिय सदस्य असल्याचे समोर येताच ६ तासांच्या पाठलागानंतर तिला पकडण्यात आले. चौकशीदरम्यान, तिच्या सहकाऱ्याच्या घरात ठेवलेली ६ किलो चांदी आणि २५ लाखांची रोकड जप्त करण्यात आली.