मुंबई : वामन हरी पेठेसोबत व्यवहार केल्याचे आमिष दाखवून गुजरातच्या हिरे व्यापा-याला ५० लाखांचा चुना लावल्याची घटना गुरुवारी गोरेगावमध्ये घडली. या प्रकरणी दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.गुजरातचे रहिवासी असलेले जयेश भनूभाई नाडोदा हे हिरे व्यापारी आहेत. तेथेच त्यांचे कार्यालय आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या ओळखीच्या संजय राठी यांनी दहिसर येथील मनूभाईसोबत त्यांची ओळख करून दिली. मनूभाईने त्यांचे सुरत येथील कार्यालय गाठले. त्यांनी मुंबईत बडे ग्राहक मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यांनी नमुना (सॅम्पल) म्हणून त्यांना सव्वा लाखाचे हिरे दिले. २८ फेब्रुवारी रोजी मुंबईत ग्राहकांना हिरे आवडले असल्याचे सांगितले. त्यानुसार, त्यांनी ५० लाखांचे हिरे अंगडीयांमार्फत पाठविले.मुंबईत आल्यानंतर त्यांनी हिरे ताब्यात घेतले. गुरुवारी मनूभाईने त्यांना हिरे घेऊन गोरेगाव येथे वामन हरी पेठे, एम. जी. रोड येथे जाऊन ग्राहकास दाखवायचे असल्याचे सांगितले. ठरल्याप्रमाणे ते मनूभाईसोबत वामन हरी पेठेंच्या ज्वेलरी शॉपसमोरील हॉटेलमध्ये बसले. वामन हरी पेठ दुकानाच्या पायºयांवर उभ्या असलेल्या इसमाला फोन केला आणि हॉटेलमध्ये बोलावून घेतले. त्याने मयूर असे नाव सांगून तो मनूभाईचा भाचा असल्याचे सांगितले.वामन हरी पेठेमध्ये हिरे दाखवून येतो असे सांगून मयूरने त्यांच्याकडील हिरे ताब्यात घेतले आणि तो बाहेर पडला. ५ मिनिटांनी मनूभाईने फोनवर बोलताना काम झाल्याचे सांगितले आणि नाडोदा यांना ज्वेलर्स शॉपमध्ये पैसे घेऊन येण्यास सांगितले. ते ज्वेलर्सच्या दिशेने निघाले, तोच इथून मनूभाईही गायब झाला. मयूरही त्या ठिकाणी नव्हता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी गोरेगाव पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.
गुजरातच्या सोने व्यापा-याला ५० लाखांचा चुना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2018 2:07 AM